

गौतम बचुटे
केज :- केज तालुक्यातील दैठणा गावातील एका शेतकऱ्याने आपले उभे पीक पाण्यात जाऊन स्वप्नांची राखरांगोळी झाल्याने धीर खचल्यामुळे ओढ्याच्या पुरात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकाच्या समय सूचकतेमुळे अनर्थ टळला आहे.
स्वप्नांची धुळदाण
या बाबतची माहिती अशी की, मागील आठवड्या पासून बीड जिल्ह्यात आणि केज तालुक्यात सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसाने शेतातील पिके सडून गेली असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतात केलेला खर्च आणि त्यातून निघणाऱ्या उत्पन्नावर शेतकऱ्याचे सर्व नियोजन असते. त्या सर्व स्वप्नांची धूळधाण झाली असल्याने अनेकांचे धीर खचले आहेत.
सावकाराचे कर्ज कसे फेडणार ?
केज तालुक्यातील दहिटना येथील खंडू हरिचंद्र मुळे या शेतकऱ्याच्या शेतातील ऊस, सोयाबीन या पिकात पाणी गेल्याने पीक हातचे गेले आहेत. पेरणी, खत औषधी यासह मशागतीसाठी झालेले कर्ज आणि मेहनत वाया गेली. त्यामुळे आता सावकार आणि बँकेचे कर्ज कसे फेडणार? या विवंचनेने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खचून नैराश्य आले आहे. त्या नैराश्यातून खंडू मुळे या शेतकऱ्याने दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी नाव्होली कडून दहिटन्याकडे वाहत असलेल्या ओढ्याला आलेल्या पुरात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्यांची चलबिचल पाहून ते ओढ्याच्या प्रवाहाकडे जात असताना त्या ठिकाणी असलेल्या राजाभाऊ कातमांडे यांनी पळत जाऊन खंडू मुळे यांना धरून त्यांना समजावून रोखण्याचा प्रयत्न केला. तरी देखील ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. परंतु राजाभाऊ कातमांडे यांच्या समयसूचकते मुळे खंडू मुळे यांचे प्राण वाचलेले आहेत.
" मला पाच एकर जमीन असून आता सर्व काही गेल्यामुळे काही शिल्लकच उरले नाही तर जगून तरी काय उपयोग" असे काळीज हेलावणारी प्रतिक्रिया खंडू मुळे यांनी प्रतिनिधीशी फोनवरून बोलताना दिली.
आता कोणतीही वाट न बघता सरकारने शेतकऱ्याला विनाविलंब मदत द्यावी :-
पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मायबाप सरकारने हेक्टरी एक लाख रु. मदत द्यावी कारण पेरणी अंतर मशागत आणि खत, बी-बियाणे, फवारणी औषधे यांचा खर्च हेक्टरी ५० हजार रु. च्या आसपास आहे.
----- महादेव मेटे, शेतकरी
परिसरातील शेतात उभे असलेल्या सोयाबीनसह काढून ठेवलेल्या सोयाबीलनला कोंब फुटले आहेत.
--- सुरज मुळे, सरपंच दहीटना
रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील सर्व परिस्थितीचा आम्ही आढावा घेत आहोत. त्या नुकसानीची माहिती शासनाला कळविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी असे कोणतेही पाऊल उचलू नये शासन शेतकऱ्याला मदत करणार करणार आहे.
राकेश गिड्डे, तहसीलदार केज