Purushottampuri Boat Accident pudhari photo
बीड

Purushottampuri Boat Accident : होडीवाल्यांना नोटिसा देऊनही कारवाई का नाही?

पुरुषोत्तमपुरी दुर्घटनेनंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

टाकरवन : पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीपात्रात होडी उलटून दोन भाविकांचा मृत्यू झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता प्रशासनाच्या निष्काळजीपणा वर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या होडी चालकांना ग्रामपंचायतीने यापूर्वीच नोटिसा बजावल्याचा दावा केला जात असताना, मग त्यांच्यावर वेळेत कठोर कारवाई का करण्यात आली नाही, असा थेट सवाल भाविक, नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.

माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे १७ मेपासून अधिक मास यात्रेला सुरुवात झाली होती. यात्रेच्या पहिल्याच दिवसापासून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. याच काळात गोदावरी नदीपात्रात भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली होती. या गर्दीचा फायदा घेत अनेक होडी चालकांकडून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन नदीतून वाहतूक सुरू होती. ही बाब स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास असूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

नोटिसा दिल्या, पण कारवाईचे धाडस का केले नाही?

ग्रामविकास अधिकारी नामदेव कोकाटे यांनी २० ते २५ होडी चालकांना नोटिसा बजावल्याचा दावा केला आहे. त्यासंदर्भातील कागदपत्रेही ते दाखवत आहेत. मात्र, केवळ नोटीस देऊन जबाबदारी संपते का? होडी चालक नियम धाब्यावर बसवत असतील तर त्यांच्यावर बंदी, जप्ती किंवा पोलिसांच्या मदतीने कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने वेळीच धडक कारवाई केली असती तर १० जून रोजी घडलेली भीषण दुर्घटना टळू शकली असती. नोटीस दिल्यानंतरही अवैध वाहतूक सुरूच राहिली, याचा अर्थ प्रशासनानेच दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.

४० ते ५० भाविकांनी भरलेली होडी उलटली; दोन जणांचा मृत्यू १० जून रोजी गोदावरी नदीपात्रात सुमारे ४० ते ५० भाविकांनी भरलेली होडी उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन भाविकांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असताना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संतापही वाढत आहे.

विशेष म्हणजे, दुर्घटनेनंतर तब्बल तीन दिवसांनी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी होडी चालक उद्धव बळीराम गायकवाड आणि त्याची पत्नी दुर्गा उद्धव गायकवाड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यास विलंब का होत आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

कर वसुली होते, मग सुरक्षेची जबाबदारी कुणाची?

यात्राकाळात होडी चालकांकडून कर वसूल केला जात असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी कोकाटे यांनी दिली आहे. होडी चालक दिवसातून किती फेऱ्या मारतात त्यानुसार कर आकारला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, नेमका किती महसूल जमा झाला, किती होड्यांना परवानगी होती आणि सुरक्षेचे कोणते निकष लावले होते, याबाबत अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांचा सवाल आहे की, जेव्हा प्रशासन कर वसूल करते, तेव्हा भाविकांच्या जीवित सुरक्षेची जबाबदारीही प्रशासनावर येते. मग सुरक्षाविषयक नियमांची अंमलबजावणी का झाली नाही?

पोलिसांचा बंदोबस्त आधी का नव्हता?

सध्या पुरुषोत्तमपुरी तीर्थक्षेत्रावर सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, हवालदार आणि कर्मचाऱ्यांसह सुमारे ३५ जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, हा बंदोबस्त दुर्घटनेपूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून तैनात केला असता, तर दोन निष्पाप जीव वाचले असते, असा आरोप मृत भाविकांच्या नातेवाईकांनी केला आहे.

पुरुषोत्तमपुरीतील ही दुर्घटना केवळ अपघात नसून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचा आरोप होत असून, या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

'वरातीमागून घोडे' प्रकार?

दुर्घटनेनंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आम्ही पूर्वीच नोटिसा दिल्या होत्या, असा खुलासा केला. मात्र, आता हा खुलासा म्हणजे 'वरातीमागून घोडे' असा प्रकार असल्याची टीका होत आहे. दुर्घटना घडल्यानंतर कागदपत्रे दाखविण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित होते, अशी भावना भाविक व्यक्त करत आहेत.

जबाबदारी निश्चित होणार का?

दुर्घटनेनंतर होडी चालकांवर गुन्हे दाखल झाले असले तरी केवळ चालकांनाच दोषी धरून प्रशासनाची जबाबदारी झटकली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नोटिसा देऊनही कारवाई न करणारे अधिकारी, सुरक्षेच्या उपाययोजना न करणारे संबंधित विभाग आणि यात्रेतील व्यवस्थापनातील त्रुटी यांचीही चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT