बीड

Parli Vaijnath Temple: एकादशी अन् दुसरा श्रावण सोमवार एकत्र: परळीत वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दोन दिवसांपासून गर्दी

परळीत आज दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त मंदिर परिसरात शिवभक्तांचा मेळा

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : एकादशी आणि दुसरा श्रावणी सोमवार एकत्र असल्याने परळीत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दोन दिवसांपासून एक लाखाहून अधिक भाविकांनी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाचा लाभ घेतला. दुसऱ्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने काल रविवार आणि आज सोमवार सलग दोन दिवस भाविक मोठ्या संख्येने परळीत दाखल झाले आहेत. मध्यरात्री 12 वा. पासूनच दर्शना रांगा भाविकांनी तुडुंब भरल्याचे दिसून येत आहे.

आज दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेत वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.काल रविवारी सकाळपासूनच वैद्यनाथ मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.दुसऱ्या श्रावण सोमवारी दर्शन घेण्यासाठी काल मध्यरात्री बारा वाजल्यापासून भाविकांनी दर्शन रांगांमध्ये गर्दी केली आहे.भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून धर्मदर्शनासाठी महिला, पुरुष आणि पासधारक अशा स्वतंत्र तीन रांगा केल्या आहेत.

तगडा पोलीस बंदोबस्त

भाविकांची सुरक्षितता, गर्दीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या देखरेखीखाली मंदिर व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तब्बल २७८ पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, आरसीपी आणि एसआरपीएफ जवानांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे. यात २० पोलीस अधिकारी, ८६ पोलीस कर्मचारी, १९ महिला पोलीस कर्मचारी, ९९ पुरुष होमगार्ड, ९ महिला होमगार्ड, आरसीपी प्लाटूनचे १५ कर्मचारी आणि एसआरपीएफ प्लाटूनचे ३० कर्मचारी यांचा समावेश आहे.

दर्शन पाससाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू करण्याची मागणी

डिजिटल पेमेंटचा वापर सर्वच क्षेत्रांत झपाट्याने वाढत असताना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ मंदिरातील दर्शन पास घेण्यासाठी अद्याप रोख रकमेवर अवलंबून राहावे लागत असल्याने भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दर्शन पासच्या काउंटरवर बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा मोठी सोय ठरू शकते. मंदिर परिसरात डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देऊन ‘कॅशलेस दर्शन पास’ व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

'स्थानिक दर्शनद्वार' व्यवस्थेची आग्रही मागणी

श्रावण महिन्यात प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असताना स्थानिक भाविक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना दर्शनासाठी होणाऱ्या अडचणी दूर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परळी वैजनाथ मंदिरात स्थानिकांसाठी स्वतंत्र ‘स्थानिक दर्शनद्वार’ किंवा स्वतंत्र दर्शन रांग सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्थानिकांना आधारकार्ड किंवा अन्य ओळखपत्राच्या आधारे स्वतंत्र दर्शनाची सुविधा द्यावी, अशी मागणी आहे.तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग, व्हीलचेअर आणि वॉकरची व्यवस्था करावी, अशी मागणी दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डाॅ.संतोष मुंडे यांनी केली आहे.

वैद्यनाथ मंदिरातील मेटल डिटेक्टर मशिन बंद

प्रभू वैद्यनाथ मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात.मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम असणे अपेक्षित आहे. मात्र, मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. वैद्यनाथ मंदिर हे अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील धार्मिक स्थळ आहे. अशा ठिकाणी प्रवेश द्वारावरील सुरक्षा यंत्रणा नियमितपणे कार्यरत ठेवणे ही केवळ औपचारिकता नसून सुरक्षेची प्राथमिक गरज आहे. घटना घडल्यानंतर सुरक्षा वाढविण्यापेक्षा घटना घडू नये यासाठी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे बंद मेटल डिटेक्टरची तातडीने दुरुस्ती करून तो कार्यान्वित करावा किंवा आवश्यक असल्यास नवीन यंत्रणा बसवावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT