Ahilyanagar Pathardi Road Bus Overturns Pudhari
बीड

Beed Bus Accident | अहिल्यानगर-पाथर्डी मार्गावर खासगी बस उलटली; २० प्रवासी जखमी

मराठवाडी येथील घटना; स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी राबविले बचावकार्य

पुढारी वृत्तसेवा

Ahilyanagar Pathardi Road Bus Overturns

आष्टी : पुण्याहून नांदेडकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यावर पलटी झाल्याची घटना अहिल्यानगर-पाथर्डी मार्गावरील मराठवाडी येथे गुरूवारी पहाटे घडली. या अपघातात बसमधील २० प्रवासी जखमी झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

‘स्वामी टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स’ची (क्र. ए.आर. ०६ बी. ६७००) बस २० प्रवाशांना घेऊन पुण्याहून अहिल्यानगर-पाथर्डी मार्गे नांदेडकडे निघाली होती. आष्टी तालुक्यातील मराठवाडी शिवारात हॉटेल सम्राटसमोर पहाटे सुमारे ३.२५ वाजता बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावर पलटी झाली.

अपघाताच्या वेळी बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. अचानक बस उलटल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अपघातात सर्व २० प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाट, कृष्णा नरवडे, प्रकाश पडवळ, सोपान येवले तसेच होमगार्ड धुमाळ यांनी अवघ्या ३० मिनिटांत घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.

पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT