Beed News : कडा परिसरात वाळू तस्करांवर कारवाई; हायवासह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

आष्टी पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल
Beed News
कडा परिसरात वाळू तस्करांवर कारवाई; हायवासह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

कडा : आष्टी तालुक्यातील कडा परिसरात बेकायदा वाळू वाहतुकीविरोधात आष्टी पोलिसांनी कारवाई करत हायवा व त्यातील चार ब्रास वाळू असा एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक दादासाहेब पांडुरंग मुटकुळे व वाहनमालक महादेव बाबासाहेब मुटकुळे (दोघेही रा. मांडेवा, ता. आष्टी, जि. बीड) यांच्याविरुद्ध वाळू चोरीप्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई सोमवारी (दि.२१) रात्री करण्यात आली.

आष्टी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून, कडा परिसरात बेकायदा वाळू वाहतुकीवर पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडा परिसरातील शिराळ रोडकडून रुईनालकोल, टाकळी अमिया मार्गे तळेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर विनापरवाना व बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अंमलदार पो.ना भुतेकर यांनी ही माहिती परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा ठाण्याचे प्रभारी अधिकारी भारत पांढरे यांना दिली.

परीक्षाधिन उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार भुतेकर तसेच सपोनि नानासाहेब सूर्यवंशी व इतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी धाव घेतली. रात्री सुमारे ८.०५ वाजता भारत बेंझ कंपनीचा हायवा वाळू वाहतूक करताना पोलिसांच्या निदर्शनास आला.पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली. त्यांच्याकडे वाहनातील वाळूबाबत पोलिसांनी शासनाची रॉयल्टी अथवा अधिकृत परवाना असल्याची विचारणा केली. मात्र,संबंधितांकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात समोर आले.

यानंतर पोलिसांनी विनापरवाना वाळू वाहतूक करणारा हायवा (अंदाजे १५ लाख रुपये किमतीचा) आणि त्यातील चार ब्रास वाळू अंदाजे २० हजार रुपये किमतीची असा एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेले वाहन व वाळू आष्टी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याप्रकरणी चालक दादासाहेब मुटकुळे व वाहनमालक महादेव मुटकुळे यांच्याविरुद्ध वाळू चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोहेकॉ. अमोल नवले हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि परीक्षाधीन उपअधीक्षक तथा आष्टी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भारत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि सूर्यवंशी,पोहेकॉ.आहेर, पोना.भुतेकर,पोहेकॉ.बनसोडे,पोअं.अक्षय लोंढे, पो.हे.कॉ.अमोल नवले आदींचा सहभाग होता.

बेकायदा वाळू वाहतुकीला लगाम?

आष्टी तालुक्यात वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई सुरू असतानाच कडा परिसरात तब्बल १५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कारवाई होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

मग यापूर्वी कारवाई का झाली नाही?...

आष्टी तालुक्यातील कडा विनापरवाना वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.मात्र, याच परिसरात यापूर्वीही अशा प्रकारची वाळू वाहतूक होत होती का? असल्यास त्यावर वेळेत कारवाई का झाली नाही? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. आष्टी पोलीस ठाण्याच्या मागील काळातील कारभाराचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशी होण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news