सीताफळाच्या बाजारभावात निम्म्याने घसरण pudhari Photo
बीड

Custard Apple News : सीताफळाला ३० ते ४० रुपये किलो दर; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

सलग पडणाऱ्या पावसामुळे उत्पादनावर मोठा परिणाम; बेभावाचा फटका

पुढारी वृत्तसेवा

Price of custard apple is 30 to 40 rupees per kg; tears in the eyes of farmers

गजानन चौकटे

गेवराई : या वर्षीच्या सीताफळ हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू असतानाही बाजारात समाधानकारक दर मिळतील या शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून बाजारात सीताफळाला फक्त ३० ते ४० रुपये किलो एवढाच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे.

व्यापाऱ्यांकडून ३०० ते ५०० रुपये प्रति कॅरेट एवढाच भाव दिला जात असून हा दर उत्पादन खर्चालाही पुरेसा ठरत नाही. सीताफळ बागेच्या देखभालीसाठी छाटणी, खत, फवारणी, पाणी व्यवस्थापन, तणनियंत्रण, मजुरी व वाहतूक अशा सर्वांवर एका एकराला ५० ते ६० हजार रुपये खर्च होतो.

शेतकऱ्यांच्या मते एकरी किमान एक लाख रुपये तरी हातात पडले पाहिजेत तेव्हाच ही लागवड फायदेशीर ठरते; परंतु यंदा उत्पन्न आणि दर दोन्ही घटल्याने हंगाम तोट्यात गेला आहे. पावसाचा तडाखा एवढा प्रचंड होता की फळधारणा कमी झाली, फळगळ वाढली आणि गुणवत्तेत मोठी घसरण झाली. ओलसर हवामानामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारण्यांवर अतिरिक्त खर्च करावा लागला, तरीही अपेक्षित दर्जाचा माल तयार झाला नाही.

या परिस्थितीचा व्यापाऱ्यांनी फायदा घेतल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून दर्जानुसार भाव कमी-कमी ठेवून माल विकत घेतला जात आहे. कष्टाने फळ काढले, परंतु किमती मात्र व्यापाऱ्यांनी आपल्या मनाप्रमाणे ठरवल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. "मेहनत आम्ही करतो आणि नफा इतर घेतात. असा हंगाम कधीच पाहिला नव्हता," अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. हंगामभर केलेल्या मेहनतीचे चीज न होताच शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. अनेकांनी कर्ज काढून बागांचे व्यवस्थापन केले असल्याने आता कर्जाच्या हप्त्यांची चिंता त्यांना सतावू लागली आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दरातील पडझड आणि वाढत्या खर्चामुळे पुढील हंगामात सीताफळ लागवड कमी करण्यावाचून पर्याय राहणार नाही. शेतकरी वर्गातून शासनाने हस्तक्षेप करून भावात स्थिरता आणावी, बाजार नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात आणि सीताफळ उत्पादकांसाठी विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा मेहनतीचे पिक असूनही शेतकऱ्यांना बेभावाचा फटका बसत राहील, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

फळबागमध्ये तरी चार दोन पैसे मिळतील म्हणून सिताफळ चे पिक घेतले परंतु अतिवृष्टीमुळे या वर्षी पिकांचे नुकसान झाले ढगाळ वातावरणामुळे फळ खाली पडू लागले सिताफळ काळे पड़ लागले या मुळे बाजारात आवक जास्त झाली आणि भाव खूपच कमी मिळले.
धनंजय उबाळे बागायतदार शेतकरी भेंडटाकळी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT