Poor condition of the Bandhara on the Purna river
तळणी, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात शेतीच्या उपयोगासाठी सिंचन व्यवस्था व्हावी यासाठी तीस वर्षापूर्वी पूर्णा नदीपात्रात तीन ठिकाणी कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते. मात्र तीनपैकी देवठाणा, उस्वद व वाघाळा येथील बंधाऱ्यांचा २००६ च्या महापुरात दोन्ही बाजूंचा भराव वाहून गेल्याने हे बंधारे फक्त शोभेचे बनले आहे. बंधाऱ्याची दुरवस्था झाली असून या बंधाऱ्यांची उच्च पातळी बंधाऱ्यात रूपांतर करण्याची मागणी मागील विधानसभेत आ. बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
देवठाणा, उस्वद व वाघाळा येथील बंधाऱ्याचा २००६ च्या महापुरात दोन्ही बाजूंचा भराव वाहून गेल्याने बंधाऱ्यात पाण्याचा एकही पाण्याचा थेंब साठवण होत नाही. त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन सिंचनापासून वर्चित राहत आहे. शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे हा शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार असतानासुद्धा तो अधिकारच सरकारच्या लालफितीत व राजकीय उदासीनते मुळे मारल्या गेला आहे.
कधी काळी या मतदार संघाला तीन आमदारांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. परंतु त्या संधीचे सोने करण्याची किमया मात्र यांना जमली नाही. या तीन बंधाऱ्याऱ्यांपैकी देवठाणा उस्वद येथील बंधारा दुरुस्ती करून त्यावर मलमपट्टी लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला असला तरी त्या बंधाऱ्याची अवस्था जैसे थे आहे.
या ठिकाणी दुरुस्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही काहीही उपयोग झालेला नाही. या बंधाऱ्यामुळे तळणी परिसरातील पूर्णा नदी काठावरील २५ गावांना फायदा होऊ शकतो. हे बंधारे दुरुस्त व्हावे यासाठी काही सामाजिक संघटनांनी रास्ता रोकोसुद्धा केला होता. तसेच या तिन्ही बंधाऱ्याचे उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी अनेक वेळा शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली होती.
या बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास गेले तर सबंध तालुक्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची क्षमता पुरवठ या तीन बंधाऱ्यांत आहे. हजारो हेक्टर जमीनही सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. गेल्या वीस वर्षांपासून या तिन्ही बंधाऱ्यांचे घोंगडे भिजत आहे. पूर्णा पाटीवरील बंधाऱ्याचे भराव टाकण्याचे काम सुद्धा अर्धवट टाकून संबंधित विभागाने सर्व यत्रणासह महिन्यापासून इतर हलवली आहे. बंधाऱ्यास दरवाजे नाहीत.