नेकनुर ः नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या कारेगव्हाण येथील डोंगरात मोबाईलवर सट्टा लावला जात असल्याची माहिती मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर नेकनूर पोलिसांच्या मदतीने मंगळवारी पहाटे यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप असा दीड लाखाचा ऐवज जप्त केला आहे. मोबाईलमधील कॉन्टॅक्टनुसार यावर खेळला गेलेला सट्टा मोठा रकमेचा असल्याची शक्यता आहे.
बीड तालुक्यातील कारेगव्हाण डोंगरात ऑनलाइन पद्धतीने सट्टा लावला जात असल्याची माहिती मुख्यालयातील पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी पहाटे या ठिकाणी छापा टाकत कारवाई केली. या ठिकाणी असलेले चार आरोपी पोलिसांच्या हाती लागले तर अनेक मोबाईलसह खेळले जाणारे कॉन्टॅक्ट मिळाले असून यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांना मोबाईल आणि लॅपटॉप असा दीड लाख रुपयांचा ऐवज ताब्यात घेत पोलिसांनी महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार कारवाई केली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली या ठिकाणी क्रिकेट मॅचवर ऑनलाईन पद्धतीने सट्टा खेळवला जात होता. याचबरोबर मोबाईलमध्ये काही जुगाराचे ॲप असून त्याद्वारे मोठी उलाढाल होत असण्याची शक्यता आहे.
मोबाईल द्वारे सट्टा खेळण्याची पद्धत शहरी भागात पाहायला मिळत होती मात्र आता याचे लोन ग्रामीण भागात पोहोचल्याचे या कारवाईनंतर स्पष्ट झाले. डोंगरात निर्मनुष्य ठिकाणी एका झोपडीत या प्रकारे लॅपटॉप, मोबाईल द्वारे ऑनलाईन जुगार, सट्टा खेळवला जात होता. या कारवाईमुळे अशा जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.