कडा : आष्टी तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा गोरखधंदा सुरू असतानाच आष्टी पोलिसांनी वाळू तस्करांविरुद्ध धडाकेबाज कारवाई करत तब्बल २१ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत वाळूने भरलेला टिप्पर, विनानंबरची स्विफ्ट कार आणि चार मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी चार जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.
आज पहाटे सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास आष्टी पोलिसांना अवैध वाळू वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली. खडकत रोडने आष्टीकडे पिवळ्या रंगाच्या टिप्परमधून वाळू भरून आणली जात असल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे व पोलीस पथकाने तातडीने खडकत रोडवर सापळा रचला.
यावेळी संशयित पिवळ्या रंगाचा टिप्पर (क्र. महा १६ डीपी ३२२४) पोलिसांनी अडविला. टिप्परची तपासणी केली असता त्यामध्ये वाळू भरलेली आढळून आली. पोलिसांनी वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव परसराम अशोक धोंडे व त्याचा सहकारी पांडुरंग संभाजी धोंडे असे सांगितले. तसेच टिप्पर व त्यामधील वाळू संदीप सुभाष पोठरे यांच्या मालकीची असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, पोलिसांच्या लोकेशन वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाची विनानंबरची स्विफ्ट कार घेऊन संदीप पोठरे घटनास्थळी आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता वाळू विक्रीसाठी आणल्याचे आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा व्यवसाय करत असल्याचे त्याने सांगितल्याचे पोलीसाना सांगितले आहे.
या कारवाईत पोलिसांनी एकूण २१ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस शिपाई नवनाथ भागीनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई...
पोलीस अधीक्षक नवनीत कावत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या सोबतीने पोलिस हेड कॉन्स्टेबल ५२४ सानप, पोलिस हेड कॉन्स्टेबल ६६४ लोमटे, पोलिस हेड कॉन्स्टेबल ६५९ सजगणे, पोलिस शिपाई २०१ शेळके आणि पोलिस शिपाई ६३१ पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अवैध वाळू वाहतुकी विरोधात पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.मात्र, तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक पूर्णपणे थांबवण्यासाठी अशा कारवाया सातत्याने होणे गरजेचे असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.