

परळी वैजनाथ : आगामी २०२६-२७च्या गळीत हंगामासाठी ओंकार साखर कारखाना प्रा. लि., युनिट क्र. ८, पांगरी (ता. परळी, जि. बीड) यांच्यावतीने ऊसदरासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे.
कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या वतीने उसदराची घोषणा करण्यात आली आहे. गळीत हंगाम २०२६-२७साठी ३३५० ऊसदर जाहीर करण्यात आला आहे. उसाला सर्वाधिक दर देणारा ओमकार साखर कारखाना बीड जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्याच्या दृष्टीने ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यांकडून जाहीर होणारे ऊसदर हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि शेतीच्या वाढत्या खर्चाचा विचार करता ऊसदराकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष असते.
ओंकार साखर कारखान्याने २०२६-२७ च्या हंगामासाठी बीड जिल्ह्यात अव्वल असा ३३५० ऊसदर जाहीर केला. या घोषणेमुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी या माध्यमातून ऊस उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, पहिला हप्ता ३२०० रुपये आणि दिवाळी हप्ता १५० रुपये असे प्रतिटन ३३५० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहेत.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना नव्या रूपात ओंकार साखर कारखाना म्हणून कार्यरत आहे. या कारखान्याने आजपर्यंत बीड जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा निर्माण केली. हीच परंपरा यावर्षीही ओंकार साखर कारखान्याने कायम राखली आहे. गतवर्षीच्या 2025-26 हंगामात ओंकार साखर कारखान्याने तीन हजार पन्नास रुपये दर दिला होता. यंदाच्या गळीत हंगाम 2026 -27 साठी यात वाढ करत प्रति टन 3350 इतका ऊस दर जाहीर केला असून हा दर बीड जिल्ह्यात अव्वल ऊस दर ठरला आहे.