गेवराई : तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर चकलांबा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल केले असून हायवा ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉलीसह सुमारे 34 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पहिल्या घटनेत चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 4 मार्च रोजी सकाळी सुमारे 8.45 वाजता मालेगाव ते उमापूर रस्त्यावर करण्यात आली. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार अजिनाथ विष्णू मुंडे (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.
यावेळी भारत बेंझ कंपनीचा हायवा ट्रक (क्र. एम.एच.-23-ए.यू.-3596) अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना आढळून आला. ट्रकच्या डंपरमध्ये सुमारे 6 ब्रास वाळू असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत 25 लाख रुपयांचा हायवा व 30 हजार रुपयांची वाळू असा एकूण 25 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गेवराई तालुक्यातील महारटाकळी येथील जावेद युसूफ पठाण याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत गुन्हा याच चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 4 मार्च रोजी सकाळी सुमारे 7.30 वाजता राक्षसभुवन परिसरातील सिमेंट रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी विनोद मधुकर सुरवसे (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी छापा टाकला असता स्वराज 744 एफई कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली यांच्या साहाय्याने गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळले.
या कारवाईत 7 लाख 50 हजार रुपयांचा ट्रॅक्टर, ट्रॉली व सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांची वाळू असा एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील सौरभ राजू उचैया (वय 28) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले असून या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास चकलांबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चांदमारे व वंजारे हे करीत आहेत.