गेवराई : गेवराई तालुक्यातील तपोनिमगाव शिवारात ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर तलवाडा पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शुक्रवार, दि. 12 रोजी ही कारवाई करण्यात आली असून संबंधित ट्रॅक्टर चालकाविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेत कारवाईचा सपाटा लावला आहे. याच पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यातील तपोनिमगाव शिवारातील दत्त बाग परिसरात गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तलवाडा पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत परमेश्वर भानुदास शिंदे (रा. तपोनिमगाव, ता. गेवराई, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी महिंद्रा कंपनीचा 757 मॉडेलचा लाल रंगाचा ट्रॅक्टर (क्र. एमएच 23 बी 7792) अंदाजे किंमत 5,00,000 रुपये, एक निळ्या रंगाची विना नंबरची लोखंडी ट्रॉली तसेच ट्रॉलीत भरलेली एक ब्रास वाळू अंदाजे किंमत 1,05,000 रुपये असा एकूण 6,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध वाळू वाहतुकीच्या साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास तलवाडा पोलीस करीत आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली असून परिसरात कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.