Beed News : दिवाळीत पुजा होणाऱ्या 'लक्ष्मी'ला घडवणारे हात 'संकटात'  file photo
बीड

Beed News : दिवाळीत पुजा होणाऱ्या 'लक्ष्मी'ला घडवणारे हात 'संकटात'

प्लास्टिकच्या झाडूंनी पारंपरिक केरसुणीची बाजारपेठ घटवली.

पुढारी वृत्तसेवा

Plastic brooms have reduced the market for traditional brooms

गेवराई : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात ज्या केरसुणीला लक्ष्मीचे प्रतीक मानून श्रद्धेने पूजले जाते, त्याच केरसुणीची निर्मिती करणाऱ्या हातांवर मात्र आर्थिक संकटाचे सावट आहे. काळ बदलला, घरांची रचना बदलली आणि स्वच्छतेची साधनेही बदलली. एकेकाळी प्रत्येक घरात हक्काचे स्थान असलेल्या पारंपरिक केरसुणीची जागा आता प्लास्टिकच्या आणि मशीननिर्मित झाडूंनी घेतली आहे. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांसमोर व्यवसाय टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

दिवाळी आली की घराघरांत स्वच्छतेची लगबग सुरू होते. अंगण, उंबरठा आणि घराचा कानाकोपरा स्वच्छ करण्यासाठी पूर्वी पारंपरिक केरसुणीचा वापर केला जात असे. एवढेच नव्हे, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या केरसुणीचे पूजन करण्याची परंपराही आजही अनेक घरांमध्ये जपली जाते. मात्र, वर्षभर ज्या केरसुणीला अपेक्षित मागणी नसते, तिला दिवाळीच्या दिवसांतच काही प्रमाणात बाजारपेठ मिळते. त्यामुळे अनेक विक्रेत्यांचे आर्थिक गणित या सणावर अवलंबून असते.

मात्र, यंदा या पारंपरिक व्यवसायाला महागाईची झळ बसली आहे. केरसुणी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच काम करण्यासाठी मजूर मिळणेही कठीण झाले आहे. दुसरीकडे प्लास्टिकचे झाडू, आकर्षक रंगांचे आधुनिक झाडू आणि मशीननिर्मित फड्यांचा बाजारातील वापर वाढत आहे.

कमी देखभाल, सहज उपलब्धता आणि बदलती जीवनशैली यामुळे ग्राहकांचा कलही आधुनिक साधनांकडे वळला आहे. विशेषतः फ्लॅट संस्कृतीमध्ये पारंपरिक केरसुणीची मागणी कमी होत असल्याचे विक्रेते सांगतात. पूर्वी घराघरांत वर्षातून अनेकदा पारंपरिक फडा खरेदी केला जात असे. आता मात्र दिवाळीपुरतीच त्याची खरेदी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वर्षभर व्यवसाय सुरू ठेवणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे या विक्रेत्यांसाठी जिकिरीचे बनले आहे.

यंदा गतवर्षीच्या तुलनेत फड्यांच्या दरात सुमारे 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकारानुसार मोठा फडा 50 ते 60 रुपये, तर लहान फडा 30 ते 40 रुपये दराने विकला जात आहे. कच्च्या मालाचा वाढलेला खर्च, मजुरांची अनुपलब्धता आणि उत्पादनातील अडचणी यामुळे दरवाढ करावी लागत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

पारंपरिक केरसुणीला वर्षभर मर्यादित मागणी असते. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर मात्र तिची विक्री वाढते. त्यामुळे या व्यवसायातील विक्रेत्यांना दिवाळीच्या हंगामाची प्रतीक्षा असते. सण संपल्यानंतर पुन्हा मागणी मंदावते. आकारानुसार फड्यांचे दर मोठा फडा : 50 ते 60 रुपये, लहान फडा : 30 ते 40 रुपये अनेक वर्षांपासून लक्ष्मीपूजनासाठी घराघरांत केरसुणी विकत घेतली जाते.

तिचे पूजन करण्याला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. केरसुणीमुळे घर आणि अंगण स्वच्छ राहते. ज्या ठिकाणी स्वच्छता असते, तिथे लक्ष्मीचा वास असतो, अशी आमची श्रद्धा आहे. आधुनिक झाडू आले तरी पारंपरिक केरसुणीचे महत्त्व कायम राहायला हवे अशी प्रतिक्रिया संगीता भारती यांनी व्यक्त केली.

कामगार मिळणेही कठीण!

पारंपरिक केरसुणी तयार करण्यासाठी आता कामगार मिळणे कठीण झाले आहे. फ्लॅट संस्कृतीमुळे आणि प्लास्टिक व मशीननिर्मित झाडूंचा वापर वाढल्यामुळे पारंपरिक फड्यांची मागणी कमी झाली आहे. त्यात कच्चा मालही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे यंदा दरात वाढ करावी लागली असे विक्रेते आनंद सुर्यवंशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT