Kada to Devinimgaon road Accident
आष्टी: कडा ते देवीनिमगाव रस्त्यावर सासू - सुनेच्या माळाजवळ मजूर वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोचा टायर फुटून मोठा अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित ११ जणांवर कडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज (दि.१) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. कामगार दिनी घडलेल्या या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रावणी विक्रम महाजन (वय १४), ऋतुजा सतीश महाजन (वय १६), व अजित विठ्ठल महाजन (वय १४) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर कडगावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल केले. कडा, धामणगाव व देवीनिमगाव येथील ग्रामस्थांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात सहभाग घेतला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.