गेवराई (बीड) : गेवराई तालुक्यात यंदा प्रधानमंत्री पिक विमा योजनेला शेतकर्यांकडून कमीसा प्रतिसाद मिळत आहे. विमा भरण्यास केवळ दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाही तालुक्यातील फक्त सुमारे 50 टक्के शेतकर्यांनीच आपल्या पिकाचे विमा कवच घेतले आहे. पिक विम्यासाठी शेतकर्यांचा हिस्सा वाढवण्यात आल्याने, आर्थिक ताणामुळे बहुसंख्य शेतकर्यांनी विमा भरायला नकार दिला असल्याचे स्पष्ट होते आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, या हेतूने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली होती. गतवर्षी तालुक्यात जवळपास तीन लाख शेतकर्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. मात्र यंदा शेतकर्यांना विमा प्रीमियममध्ये अधिक हिस्सा भरावा लागत असल्याने केवळ 1 लाख 42 हजार शेतकर्यांनी विमा भरला असून तोही 50 हजार हेक्टर क्षेत्रापुरता मर्यादित राहिला आहे. तालुक्यातील सुमारे सवा लाख हेक्टर क्षेत्राची खरिप पेरणी पूर्ण झाली असतानाही, विमा संरक्षण केवळ अर्ध्या क्षेत्रापुरतेच घेतले गेले आहे, हे चिंताजनक चित्र आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना नैसर्गिक आपत्तीत आधार मिळावा, हा शासनाचा उद्देश आहे. पण भरपाईच्या प्रक्रियेतला विलंब, अपारदर्शकता आणि विमा भरूनही नुकसानभरपाई न मिळण्याच्या अनुभवामुळे अनेक शेतकरी नाराज आहेत. यंदा आर्थिक सहभाग वाढवण्यात आल्याने शेतकर्यांचे विम्यावरचा विश्वास अधिक डळमळीत झाला आहे. शासनाने जर शेतकर्यांचे विम्याचे प्रश्न सोडवले नाहीत, तर या योजनेची व्याप्ती कमी होऊन पिकविमा नावापुरता उरेल!
सिरसदेवी-17,564
तलावडा-14,803
चकलांबा-14,102
उमापूर-8,099
जातेगाव-11,580
कोळगाव-11,030
मादळमोही-10,595
पाचेगाव-11,650
पाडळसिंगी-9,655
धोंडराई-6,008
गेवराई-7,540
रेवकी-7,093