Sugarcane 
बीड

Beed sugarcane burnt| डोळ्यांदेखत तीस एकर उसाची झाली राख

फुलसांगवी येथील घटना; दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांवर मोठा आघात

पुढारी वृत्तसेवा

शिरूर, गेवराई - वर्षभर कष्ट केले... उन्हातान्हात राबून ऊस वाढवला... पिकासाठी पैसा खर्च केला... आता पीक हातात येईल आणि संसाराला थोडा आधार मिळेल, अशी आशा मनात होती. मात्र, सोमवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीने शेतकऱ्यांच्या या आशेवरच राख टाकली. डोळ्यांदेखत हिरवेगार ऊसाचे पीक आगीच्या ज्वाळांत होरपळत होते; ते वाचवण्यासाठी धावपळ सुरू होती, पण आग विझविण्यासाठी पाणीही उपलब्ध नव्हते. पाहता पाहता तब्बल ३० एकरांवरील ऊस जळून खाक झाला. ऊसासोबत ठिबक सिंचनाचे पाईपही जळाले. शेतात उरली ती केवळ राख आणि शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेले आर्थिक संकट!

गेवराई तालुक्यातील फुलसांगवी शिवारात सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवारातील गट क्रमांक २६३, २६५ आणि २७० मधील ऊसाला अचानक आग लागली. उसाच्या पाचटाने पेट घेतल्यानंतर आगीने वेगाने रौद्ररूप धारण केले. काही वेळातच आगीच्या ज्वाळांनी मोठे क्षेत्र कवेत घेतले. वर्षभर जपलेले पीक क्षणाक्षणाला जळत होते आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या कष्टांची राख होत होती.

शेतात आग लागल्याचे समजताच पीक वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाली. मात्र, परिसरात पाणी उपलब्ध नसल्याने आग विझविण्याच्या प्रयत्नांत अडचणी निर्माण झाल्या. एकीकडे आगीच्या ज्वाळा उसाला कवेत घेत होत्या, तर दुसरीकडे वर्षभराच्या मेहनतीचे काय होणार, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा होता. ऊस जळून खाक झाल्याने उत्पादनाची आशा संपली, तर ठिबक संच जळाल्याने सिंचनासाठी पुन्हा खर्च करण्याची वेळ आली आहे. म्हणजेच, एका आगीत पीक आणि शेतीसाठी केलेली गुंतवणूक, दोन्हींचे नुकसान झाले.

या आगीत विष्णू पंजाबापू तळेकर, दिलीप शंकरराव तळेकर, गंगाभिसेन रावसाहेब तळेकर आणि भाऊसाहेब नामदेव इंगळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळाला. ऊस लागवडीपासून मशागत, खते, मजुरी आणि सिंचनापर्यंत केलेला खर्च आता कसा भरून काढायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

मात्र, नुकसान नोंदविले गेले असले तरी प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार, याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आगीच्या कारणाची चौकशी करून नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आधार मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जय भवानी कारखान्याची तत्पतरा फुलसांगवी येथील १९ शेतकऱ्यांचा ३० एकर ऊस जळून खाक झाल्यानंतर शेतकऱ्यावरती भर दुष्काळात मोठे संकट कोसळले आहे. यामुळे सर्वत्र हळूहळू व्यक्त होत असताना जय भवानी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्या प्रती आपली आपुलकी दाखवून २४ तासाच्या आत त्या ठिकाणी १० ते १२ टोळ्या पाठवून शेतकऱ्याचा जळीत झालेला ऊस तोडून घेऊन जाण्याची तत्परता दाखवल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. संकटाच्या काळामध्ये जय भवानी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याने परिसरातील शेतकरी वर्गामध्ये जय भवानी सहकारी साखर कारखान्याबद्दल आणि पंडित परिवाराबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. गावचे उपसरपंच आजिनाथ तळेकर यांनी जय भवानी कारखान्याचे आभार व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT