Pea pod prices have fallen; the result of increased supply.
गजानन चौकटे
गेवराई : तालुक्यात सध्या भाजी बाजारात विक्रीस येणाऱ्या वाटाणा शेंगा या स्थानिक शेतकऱ्यांचा नसून तो थेट मध्यप्रदेश तसेच पुणे जिल्ह्यातील कात्रज परिसरातून मोठ्या प्रमाणात येत आहे. बाहेरील भागांतून झालेल्या भरघोस आवकेमुळे गेवराई बाजार व शहरातील किरकोळ भाजी बाजारात गोल्डन वाटाण्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
हंगामाच्या सुरुवातीला प्रतिकिलो ७० रुपये दर मिळणारा गोल्डन वाटाणा सध्या ४० रुपये किलो दराने विकला जात असून, दरातील या घसरणीचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. गेवराई तालुक्यातील शेतकरी गोल्डन वटाण्याची लागवड करत नसल्याने बाज-ारातील संपूर्ण उलाढाल ही परराज्य व बाहेरील भागांतून येणाऱ्या मालावर अवलंबून आहे. एमपी व कात्रज परिसरात एकाच कालावधीत मोठ्या प्रमाणावर काढणी झाल्याने ट्रकद्वारे माल महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये पाठवला जात आहे. आवक वाढली असली तरी मागणी त्या तुलनेत मर्यादित राहिल्याने व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा वाढली असून, त्यामुळे दर कमी होत आहेत.
दर घसरल्यामुळे गेवराई शहरासह तालुक्यातील ग्राहकांना दिलासा मिळाला असून, स्वस्त दरात ताजा व दर्जेदार गोल्डन वाटाणा उपलब्ध होत आहे. घरगुती वापरासोबतच हॉटेल, ढाबे व कॅटरिंग व्यवसायातही गोल्डन वटाण्याची मागणी वाढली आहे. पोषणमूल्यांनी समृद्ध असलेल्या या वाटाण्यात प्रथिने, फायबर व विविध जीवनसत्त्वे असल्याने तो आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त मानला जातो.
व्यापारी वर्गाच्या मते, येत्या काही दिवसांत मध्यप्रदेश व कात्रज भागातून होणारी आवक कमी झाल्यास दरात काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत गेवराई बाजारात गोल्डन वाटाण्याच्या दरांमध्ये चढ-उतार कायम राहतील, असे चित्र आहे. वाटाणा हा पोषणमूल्यांनी समृद्ध असा भाजीपाला असून तो आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. वाटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असल्याने शरीरातील स्नायूंची वाढ व दुरुस्ती होते. तसेच फायबर मुबलक असल्यामुळे पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
वाटाण्यामध्ये लोह व फॉलिक सिड असल्याने रक्तवाढीस हातभार लागतो व अशक्तपणा कमी होतो. त्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील घातक घटक नष्ट करून हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. कमी चरबी आणि कमी कॅलरी असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही वाटाणा उपयुक्त ठरतो. नियमित आहारात बटाण्याचा समावेश केल्यास साखर नियंत्रणात राहण्यास, डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास तसेच त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत होते. त्यामुळेच वाटाणा हा आरोग्यदायी, चविष्ट आणि आहारात महत्त्वाचे स्थान असलेला भाजीपाला मानला जात असल्याची माहिती डॉ. राम दातार यांनी दिली.
आवक कमी झाल्यास दर वाढतील
सध्या गेवराई बाजारात येणारा गोल्डन वाटाणा हा एमपी आणि कात्रजमधून येतोय. आवक खूप वाढल्यामुळे आधी ७० रुपये किलो विकला जाणारा वाटाणा आता ४० रुपयांपर्यंत आला आहे. दर कमी झाल्याने ग्राहकांची खरेदी वाढली आहे, पण माल जास्त असल्यामुळे विक्रेत्यांना फारसा नफा उरत नाही. पुढील काही दिवसांत आवक कमी झाली तर दर थोडे वाढतील, अशी माहिती विक्रेता शुभम सोलकर यांनी दिली.