Pawar pattern of development works discussed in Beed
बीड, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यात गत काही काळात घडलेल्या घटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. प्रारंभीच्या काळात बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षाचे आमदार त्यांच्यासोबत बैठकांना उपस्थित असायचे. परंतु गेल्या आठ दिवसांत रेल्वे तसेच स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या प्रश्नावर मुंबईत झालेल्या बैठकांमधून स्थानिक नेते अनुपस्थित असल्याचे दिसले. या बैठकांमधून अधिकाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याने विकासकामांचा हा पवार पॅटर्न असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यात घडलेल्या काही घटनांमुळे पालकमंत्रीपद कोण स्वीकारणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. स्वतः मुख्यमंत्र्यांनीच पालकमंत्री व्हावे अशी मागणी केली जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत बीडचे पालकत्व स्वीकारले. तेव्हापासून बीडमध्ये विकासकामे गतीने होत असल्याचे दिसते. परंतु या विकासकामांमध्ये पवार पॅटर्नची झलक बीडकरांना पहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी महसूल भवनाच्या झालेल्या भूमिपूजनावेळी स्वतः पवारांनी संबंधित कंत्राटदाराला काम दर्जेदार नाही झाले तर ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा इशारा दिला होता. या पाठोपाठ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या विस्तारीकरणाबाबतची बैठक मुंबईत झाली. त्या पाठोपाठ १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू करण्याबाबतची आढावा बैठक देखील मुंबईत झाली. या दोन्ही बैठकांना स्थानिक आमदारांचीसुद्धा उपस्थिती नव्हती. केवळ बीडमधील अधिकारी उपस्थित होते.
एरव्ही कोणत्याही मंत्र्यांकडे बीडसंदर्भातची बैठक असेल तर त्या मतदारसंघाचे अथवा बीडमधील काही आमदार उपस्थित असायचे. परंतु अजित पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकांना स्थानिक आमदार दिसत नसल्याने याची चर्चा होत आहे. आता १७ सप्टेंबरला थेट पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचा शुभारंभ होणार असताना बीडमधील सत्ताधारी आमदार, मंत्री मात्र या सर्व कार्यक्रमापासून दूरच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष देखील आहेत. अशा स्थितीत बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके व आ. विजयसिंह पंडित हे तीन आमदार त्यांच्या शब्दाबाहेर असू शकत नाहीत. तर भाजपाचे आ. सुरेश धस व आ. नमिता मुंदडा हे देखील दादांच्या निर्णयावर विश्वास ठेवणारे आहेत. एकमेव विरोधी आमदार संदीप क्षीरसागर तर अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयांचे मोठमोठे बॅनर्स लावत असल्याचे पहायला मिळते. तर मंत्री पंकजा मुंडे या देखील बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार झाल्यापासून प्रशासकीय पातळीवर फारसे लक्ष देत नसल्याचे दिसते. यामुळे बीडबाबत पालकमंत्री अजित पवार घेतील तोच निर्णय अंतिम ठरत आहे.