Patoda protest pudhari photo
बीड

Patoda protest : ‘दुर्गा’ला न्याय देण्यासाठी पाटोद्यात जनआक्रोश

जलदगती न्यायालयात प्रकरण चालविण्याची मागणी; विद्यार्थी, ग्रामस्थ एकवटले

पुढारी वृत्तसेवा

पाटोदा : पाटोदा तालुक्यातील एका गावामध्ये 1 सप्टेंबर रोजी एका आठ वर्षीय ‘दुर्गा’वर अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणातील 65 वर्षीय नराधम आरोपीला घटनास्थळावरुनच ताब्यात घेण्यात आले होते, तो सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे या मागणीसाठी पाटोदा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.

पाटोदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी आरोपीला फाशी द्या, प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा अशी मागणी करणारे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. मोर्चा उपविभागीय कार्यालयात पोहचल्यानंतर सभेमध्ये रुपांतर झाले.

यावेळी पाटोदा शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नेांदवत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच विविध शालेय विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले.

यावेळी तहसीलदारांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थीनींनी निवेदन देतांना आमच्या मागण्यांवर तुम्ही काय कारवाई करणार ते आताच सांगा असा हट्ट उपविभागीय अधिकार्‍यांकडे धरला. यावेळी उपविभागीय अधिकार्‍यांनी प्रकरणात प्रशासन म्हणून जी काही मदत करता येईल ती आम्ही करणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शेख मेहबुब यांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. पाटोदा शहर व तालुक्यात छेडछाडीच्या घटना वाढलेल्या असतांना पोलिस कठोर कारवाई का करत नाहीत? त्यांच्यावर कोणाचा राजकीय दबाव आहे का असा सवाल करत या प्रकरणात संबंधीत पीडित कुटूंबीयांच्या पाठीशी आम्ही उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘दुर्गा’ला न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारणार : बाळा बांगर

पाटोदा तालुक्यातील आठ वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर हे प्रारंभापासून आक्रमक भूमिकेमध्ये आहेत. यापूर्वी त्यांनी या कुटूंबीयांची भेट घेत आर्थिक मदत दिली होती. यानंतर मोर्चासाठी पुढाकार देखील घेतला. या मोर्चावेळी बोलतांना बाळा बांगर म्हणाले की, दुर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. अत्याचार होत असतांना तिच्या चुलतीने ओरडण्याचा आवाज ऐकल्याने तिचे प्राण वाचले. अशीच घटना शहरी भागात घडली असती तर मोठा आवाज उठवला गेला असता, परंतु ग्रामीण भागातील मुली सुरक्षित नसतांना कोणी दखल घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या कुटूंबाच्या पाठीशी आपण उभा राहणार आहोत. प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, तज्ञ वकिलाची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली. या मागण्या मान्य झाल्या नाही तर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील बाळा बांगर यांनी दिला.

शाळेजवळच अवैध दारुचे दुकान; विद्यार्थिनी दहशतीखाली

अत्याचाराची घटना ज्या गावात घडली, त्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून दारुबंदी आहे. परंतु गावाबाहेर शाळेच्या अगदी जवळच असलेल्या गायरानाच्या जागेत याच प्रकरणातील आरोपी व त्याचा भाऊ अवैध दारु विक्री करत होते. आता आरोपी पोलिस कोठडीत असतांनाही ही दारु विक्री सुरुच आहे, हे विशेष. ही अवैध दारु विक्री बंद करा म्हणून यापूर्वी देखील गावकर्‍यांनी निवेदन दिले होते, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. शाळेत ये-जा करतांना विद्यार्थीनींना याच परिसरात बसची प्रतिक्षा करत थांबावे लागते, अशा वेळी दारुड्यांकडून त्रास होत असल्याचे देखील विद्यार्थीनींनी सांगितले. एव्हढ्या गंभीर प्रकरणातही पोलिस कारवाई का करत नाहीत? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT