Parli News : नात्‍यांच्या जाणिवा 'मृत' पण परळीकरांची माणुसकी 'जिवंत', बेवारस व्यक्तीवर केले अंत्यसंस्कार ! File Photo
बीड

Parli News : नात्‍यांच्या जाणिवा 'मृत' पण परळीकरांची माणुसकी 'जिवंत', बेवारस व्यक्तीवर केले अंत्यसंस्कार !

आप्तांनी नाकारलं, परळीकरांनी सामाजिक भान जपलं

पुढारी वृत्तसेवा

Parlikar's humanity 'alive': Funeral held for orphaned person

परळी वैजनाथ : पुढारी वृत्तसेवा

नेहरू चौक (तळ) परिसरात मागील २० वर्षांपासून राहणाऱ्या बेवारस बालाजी सोळंके यांचे काल (दि.१४) रोजी सकाळी निधन झाल्याचं निदर्शनास आलं. रस्त्याच्या बाजूला मृतावस्थेत आढळून आल्याने सामाजिक कार्यकर्ते शिंदे यांनी तत्काळ परळी शहर पोलीस ठाणे व नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला.

माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने मृत सोळंके यांची ओळख पटवली. त्यांच्या परभणी येथील सख्या बहीण संपर्कात आल्यावर, मागील २० वर्षांपासून कोणताही संबंध नसल्याचं सांगत त्यांनी अंत्यविधी करण्यास स्पष्ट नकार दिला. नात्याची जबाबदारी टाळण्यात आली, मात्र यावेळी माणुसकीनं पाऊल उचलण्यात आलं.

या स्थितीत निर्माण झालेला पेचप्रसंग पाहता, सामाजिक बांधिलकी जपत परळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नितीन शिंदे, सेवकराम जाधव व शिवाजी देशमुख यांनी पुढाकार घेतला. पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने, सायंकाळी ५:३० वाजता परळीतील स्मशानभूमीत हिंदू धर्माच्या रूढीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यविधीच्या वेळी बीट हवालदार चरणसिंग वळवी व पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्या अधिकृत उपस्थितीत विधी पार पडला. या प्रसंगी केशवराव मुंडे, आबासाहेब देशमुख, उत्तम मोरे, साजिद खान, बेकरी व्यावसायिक माहेमूद खान, प्लंबर नासिरभाई, अन्नूभाई यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

विशेष म्हणजे, मृत व्यक्ती त्याच्या दुकानासमोर झोपत असे आणि त्यामुळे दुकानाचे अप्रत्यक्ष संरक्षण होत होते, याची जाणीव ठेवत साजिद खान यांनी सरपणासाठी लाकडे पुरवली. जाती-धर्माचं बंधन झुगारून दिलेली ही मदत माणुसकीचं उत्तम उदाहरण ठरली.

पार्थिवाला पुष्पहार अर्पण करत केशवराव मुंडे व शिवाजी देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली. थोड्याच लोकांच्या उपस्थितीत, परंतु मनोभावे पार पडलेला हा अंत्यसंस्कार माणुसकीचा मोठा विजय ठरला. रक्ताचं नातं नसतानाही एक माणूस दुसऱ्या माणसासाठी उभा राहू शकतो आणि हेच खरे सामाजिक भान आहे. ही घटना समाजाला हाच संदेश देत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT