Teacher  Pudhari
बीड

Beed news : परळीतील जिल्हा परिषद शाळा 'वाऱ्यावर'; ६२३ पैकी तब्बल ५५० शिक्षक मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण ड्युटीवर

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम; केवळ ७३ शिक्षकच प्रत्यक्ष अध्यापन कार्यावर

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेसाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आल्याने परळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील अध्यापन व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. तालुक्यातील एकूण ६२३ जिल्हा परिषद शिक्षकांपैकी तब्बल ५५० शिक्षकांना बीएलओ (Booth Level Officer) म्हणून मतदार नोंदणी व सखोल पुनरीक्षणाच्या कामावर नियुक्त करण्यात आले आहे. परिणामी, केवळ ७३ शिक्षकांवरच विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची जबाबदारी येऊन पडली आहे.

भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र राज्यासह १६ राज्य व ३ केंद्रशासित प्रदेशामध्ये घोषित केलेला असून त्याची अंमलबजावणी राज्यात सुरु झालेली आहे. त्याअनुषंगाने, बीड जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये ही मोहीम सुरु झाली आहे. कामकाज हे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे दि. ३०/०६/२०२६ ते २९/०७/२०२६ या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून जि.प.शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) याना देण्यात आलेले सहाय्यक हे बहूतांश प्रमाणात शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय दोन बीएलओची नियुक्ती करण्यात आली आहे. परळी तालुक्यातील केंद्रांच्या संख्येनुसार काही ठिकाणी एक व काही ठिकाणी दोन अशा शिक्षकांना कामाला लावण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना या कामावर पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये ५० ते ९० टक्क्यांपर्यंत शिक्षक वर्गाबाहेर असून काही शाळांमध्ये तर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच शिक्षक शिल्लक राहिल्याचे वास्तव आहे. तसेच काही शाळा तर विनाशिक्षक बनल्या आहेत. शिक्षकांना मतदार नोंदणी, SIR सर्वेक्षण आणि इतर अशैक्षणिक कामांमध्ये गुंतविल्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन विस्कळीत झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये याचा मोठा फटका बसत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची चिंता पालक आणि शिक्षणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

शिक्षक संघटनांनीही शिक्षण विभागाने शैक्षणिक कामाला प्राधान्य देत अशैक्षणिक कामांसाठी पर्यायी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी केलेली आहे. शाळांमधील अध्यापन सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन करून शाळाही सुरु राहतील आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेचे राष्ट्रीय कामही होईल असे सुक्ष्म नियोजन करणे गरजे बनले आहे. दरम्यान, परळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या केवळ ७३ शिक्षक अध्यापन करत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याबाबत शासन व प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT