Parli Vaijnath Jyotirlinga
परळी वैजनाथ : हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकराची आराधना, उपासना आणि भक्तीचा सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दरवर्षी श्रावण महिन्यात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी परळी वैजनाथ येथे दाखल होतात. त्या अनुषंगाने वैद्यनाथ देवस्थान समितीकडून जय्यत तयारी सुरू आहे.
पौराणिक मान्यतेनुसार श्री वैद्यनाथ हे रोगहारी, दुःखनाशक आणि मनोकामना पूर्ण करणारे ज्योतिर्लिंग मानले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवार, विविध सणांचे दिवस आणि महिनाभरातील अन्य धार्मिक पर्वांनिमित्त येथे भक्तांची विशेष गर्दी होत असते. भगवान शंकराला जलाभिषेक, बेलपत्र अर्पण आणि रुद्राभिषेक करण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने परळी वैजनाथची वाट धरतात.
यंदाही श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन श्री वैद्यनाथ देवस्थान समितीने मंदिर परिसरात व्यापक नियोजन सुरू केले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने मंदिरात प्रवेश केल्यानंतर दर्शन रांगांवर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले असून, भाविकांना पाऊस, ऊन किंवा अन्य अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. मंदिर परिसरातील विविध ठिकाणी बॅरिकेडिंग करून दर्शन रांगा अधिक शिस्तबद्ध करण्यात येत आहेत.
भाविकांची गर्दी सुरळीतपणे हाताळण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र रांग, पुरुषांसाठी स्वतंत्र रांग तसेच पासधारकांसाठी स्वतंत्र रांग अशी तीन स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर दर्शन रांगांमध्ये बसण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे.
कमी वेळेत आणि सुलभ पद्धतीने दर्शन मिळावे, हा देवस्थान समितीचा प्रयत्न असल्याचे वैद्यनाथ देवस्थान समितीचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून, श्रावणातील वाढती गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येत आहेत. मंदिर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणेची नजर राहणार असून, पोलीस प्रशासन आणि देवस्थान समिती यांच्यात समन्वय ठेवून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. श्रावण महिन्यातील धार्मिक उत्साह, लाखो शिवभक्तांची उपस्थिती आणि सुरळीत दर्शन व्यवस्था यामुळे दरवर्षी प्रमाणेच यंदाही परळी वैजनाथ नगरीत महिनाभर भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, श्री वैद्यनाथ देवस्थान समितीने भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि शिस्तबद्ध दर्शन देण्यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात सुरू केली आहे.