Parli Vaijnath Huge crowd of devotees for darshan on the first Monday of Shravan
परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : श्रावण सोमवार म्हणजे भक्तीचा उत्कट आरंभ. आणि त्यात जर तो पहिलाच सोमवार असेल, तर परळी वैजनाथमध्ये दर्शनासाठी काय हालचाल असेल, याची कल्पनाच न केलेली बरी! आज पहाटेपासूनच परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अक्षरशः तुफान गर्दी उसळली होती. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र मंदिरात लाखो भक्तांनी दर्शनासाठी अरुणोदय च्या आधीच रांगा लावल्या होत्या.
हर हर महादेव!, जय शिव शंभो!, वैद्यनाथ महाराज की जय! या घोषणांनी परिसर ढवळून निघाला. रविवार रात्रीपासूनच मंदिर परिसरात दर्शन करण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. आज सकाळपासून रांगांमध्ये भाविकांची प्रचंड संख्या बघायला मिळाली.
देवस्थान समितीच्या अंदाजानुसार, दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 1 लाख भाविकांनी प्रभूंचे दर्शन घेतले. देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या भाविकांची गर्दी इतकी होती की, मंदिर परिसर गर्दीने गच्च भरून गेला होता.प्रशासनाने या गर्दीस नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या होत्या. महिलांसाठी स्वतंत्र रांगा, बॅरिकेट्स, पोलीस बंदोबस्त तैनात होते.
लातूर येथून ललितकुमार आणि विजयकुमार शर्मा यांच्या पुढाकाराने 300 भाविकांची भव्य कावड यात्रा आली होती. गंगेचे कडेकोट पोलिस बंदोबस्त मोठ्या गर्दीचा अंदाज घेत पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या बंदोबस्तात 04 पोलिस निरीक्षक, 27 पोलीस उपनिरीक्षक/सहायक पोलिस निरीक्षक, 133 पुरुष पोलीस अंमलदार, 40 महिला अंमलदार, 120 होमगार्ड, 01 ठउझ टीम, 01 इऊऊड (बॉम्ब शोध पथक) टीम तसेच 01 सध्या वेशातील पोलिसांची टीम तैनात करण्यात आली आहे. याशिवाय मंदिराचा सुरक्षेसाठी पूर्ण स्टाफ कार्यरत होते.
शहर व परिसरातील शिवमंदिरांतही भक्तांचा ओघ परळी शहरासह संपूर्ण तालुक्यात आज शिवमंदिरांत भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. मालेवाडी - अंधारेश्वर जिरेवाडी - सोमेश्वर टोकवाडी - रत्नेश्वर धर्मापुरी - मल्लिकार्जुन या शिवालयांमध्येही भक्तांनी रांगा लावून दर्शन घेतले.
श्रावणामुळे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच सुमारे पाच क्विंटल फुलांनी सुंदर आरास केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात 135 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगांची सोय करण्यात आली असून स्वयंसेवक आणि पोलिसांची विशेष यंत्रणा येथे कार्यरत आहे. आज सुमारे एक ते दीड लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज आहे.