Parli Vaijnath : Election of Vaidyanath Cooperative Bank
परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : बैंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., परळी वैजनाथच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जिल्हा उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. सध्या या बँकेवर ना. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ आहे.
७ ते ११ जुलै दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १४ जुलै रोजी अर्जाची छाननी होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत १५ जुलै ते २९ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. अंतिम यादी व चिन्हांचे वाटप ३० जुलै रोजी होईल. मतदान १० ऑगस्टला सकाळी ८ ते संध्या ४ वा. पर्यंत होणार आहे. १२ ऑगस्टला सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होवुन निकाल लागेल.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे संचालक मंडळ हे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखालीलच राहिलेले आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर आजतागायत या बँकेवर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ निर्विवाद निवडून आलेले आहे. सध्य परिस्थितीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या मुंडे बंधू-भगिनींमधील दुरावा संपलेला आहे. त्याचबरोबर एकत्रितपणाने सर्व निवडणुकांमध्ये ते काम करतांना दिसत आहेत. यापुर्वी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही दोघांनी मिळून बिनविरोध केली होती.
या अनुषंगानेच वैद्यनाथ बँकेची संचालक मंडळ निवडणूकही यावेळी बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खरोखरच नेहमी चुरस असलेल्या वैद्यनाथ बँकेला यावेळी बिनविरोध संचालक मंडळ मिळणार की निवडणूक होणार ? याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदतः ७ते ११ जुलै, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत, छाननी प्रक्रियाः १४ जुलै, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदतः १५ ते २९ जुलै, चिन्हांचे वाटप व उमेदवारांची अंतिम यादीः ३० जुलै, मतदानाचा दिवसः १० ऑगस्ट, सकाळी ८ ते संध्याकाळी ४, मतमोजणीः १२ ऑगस्ट, सकाळी ८ वाजल्यापासून सुरूहोणार आहे.
पुढीलप्रमाणेः सर्वसाधारण १२ जागा, अनुसूचित जाती १ जागा, इतर मागासवर्गीय १ जागा, भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग - १ जागा, महिला प्रतिनिधी- २ जागा