

Money Lenders Torture Case In Beed
बीड, पुढारी वृत्तसेवा खासगी सावकरांची नावे चिठ्ठत लिहून एका तरूण कापड व्यावसायिकाने घरासमोर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी काळा हनुमान ठाणा पेठ बीड भागात उघडकीस आली. सदरील व्यापाऱ्याने लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपा भटके विमुक्त सेलचा जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव याच्यासह सातजणांची नावे आहेत. या प्रकरणात पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच डॉ. जाधव याला अटक करण्यात आली आहे.
राम दिलीप फ टाले (४२, रा. काळा हनुमान ठाणा, पेठबीड) असे आत्महत्या केलल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. राम याच्या आत्महत्या प्रकरणात त्याचे वडील दिलीप फटाले यांनी पेठवीड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये राम याने लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहीले आहे की, डॉ. लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी वर्षा जाधव यांनी मानसिक छळ केला. मी त्यांच्याकडून व्याजाने घेतलेले पैसे परत केले तरी मला लक्ष्मण जाधव त्रास देत असल्याबाबत लिहीले आहे. राम याने डॉ. जाधव यांच्याकडून सात वर्षापूर्वी अडीच लाख रुपये दहा रुपये टक्के व्याजाने घेतले होते. सदर रक्कम आम्ही दोघांनी मिळून त्यास लॉकडाऊनपूर्वी परत केली.
त्यानंतर तो आमच्या घरी येवून दमदाटी करुन पंचवीस हजार रुपये महिना प्रमाणे पैसे घेवून जात होता. मी व माझ्या मुलाने दिलेले चेक त्याने परत दिलेले आहेत. यातच दि.४ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ. लक्ष्मण जाधव, त्याची पत्नी वर्षा जाधव हे घरी आले होते. त्यांनी मुलगा राम यास पैसे परत करण्याबाबत विचारणा करत धमकी दिली होती. याबरोबरच कल्याण फायनान्सचा दिलीप उघडे, मेडीकलवाला काशीद के. के. व त्याची सासु, वारे बाई, मस्के, मधु चांदणे हे देखील घरी येवून मुलाला पैशाच्या कारणावरुन मानसिक त्रास देत होते असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास एपीआय नित्यानंद उबाळे हे करत आहेत.
राम फटाले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सहा पानांची सुसाईड नोट लिहीली आहे. यामध्ये मी चांगला पती, पिता होऊ शकलो नाही अशी खंत व्यक्त करत यापुढे तुम्ही सर्वजण चांगले रहा, मुलांनो अभ्यास करा असे म्हणत पत्नीला सर्व जबाबदारी स्विकारण्याविषयी म्हटले आहे. याबरोबरच जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना उद्देशून पत्र लिहीत त्यामध्ये सावकारांची नावे नमुद केली आहेत.
व्यापारी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ. लक्ष्मण जाधव याने सोशल मिडीयात पोस्ट करत आपल्याला राजकीय बळी ठरवलं, चुकीच्या पद्धतीने गुन्ह्यात अडकवलं. मला आत्महत्येच्या प्रकरणात अटक केली आहे, विशेष म्हणजे पत्नीलाही आरोपी केले अशी पोस्ट लिहीली आहे.