Parli Murder Case Mother demands inquiry into Karad school
परळी, पुढारी वृत्तसेवाः २०१० मध्ये माझे पती वारले, २०१६ पासून आम्ही माझ्या मुलाच्या नोकरीसाठी प्रयत्न करतोय. सगळं त्या साने गुरुजी शाळेच्या उद्धव कराडने केलंय, माझं लेकरू मेलं नाही, त्यांनी छळ करून मारलंय, त्याचा मानसिक छळ करून.. याला जबाबदार असलेल्या उद्धव कराडच्या साने गुरुजी शाळेची सखोल चौकशी करा अशी मागणी श्रीनाथ गित्ते याची आई सुनिता गिते यांनी केली.
परळी तालुक्यातील नंदागौळ येथील श्रीनाथ गोविंद गित्ते या तरुणाने २२ ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणात परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात संजय राठोड व उद्धव कराड या दोन आश्रमशाळा चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनाथ याचे वडील गोविंद गित्ते हे केज तालुक्यातील साने गुरुजी आश्रमशाळेवर सहशिक्षक म्हणून कार्यरत होते.
त्यांचे २०१० मध्ये हृदयविकाराने निधन झाले. २०१६ पासून गित्ते कुटूंबाने श्रीनाथ याला अनुकंपा तत्वावर नोकरी घ्यावे अशी विनंती संस्थाचालक उद्धव कराड याच्याकडे केली. त्यावर उद्धव कराडने त्यांना अपमानास्पद वागणूक देत कोणाकडे तक्रार करायची ती करा असे उत्तर देत नोकरीवर घेण्यास नकार दिला.
यानंतर गित्ते कुटूंबाने समाजकल्याण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात यासंबंधी पाठपुरावा केला. अखेर परळी तालुक्यातील संजय राठोड याच्या संस्थेच्या आश्रमशाळेत श्रीनाथ याला कामाठी या पदावर नोकरी मिळाली. त्या ठिकाणी रुजू होवून एक महिन्याचा कालावधी होत नाही तोच संजय राठोड यानेही त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. तु उद्धव कराड यांना विरोध करायला नको होतास असे म्हणत अधिकचे काम सांगण्याबरोबरच मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. यातूनच श्रीनाथ याने आत्महत्या केल्याच्या आरोप ठेवत परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.