Beed Parli News file photo
बीड

Beed Parli News: वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना; डॉक्टरांनी २२ तास मृत बाळ मातेच्या पोटातच ठेवले!

परळी वैजनाथ शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपचारातील हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Beed Parli News

परळी वैजनाथ: शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपचारातील हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर या ह्रदयद्रावक घटनेनंतरही गांभीर्य न घेता केवळ अर्थिक लाभ उठविण्याच्या उद्देशाने या गरोदर मातेच्या पोटात तब्बल २२ तास मृत भ्रूण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बाळ तर दगावलेच पण त्यानंतर या बाळाच्या मातेची प्रचंड हेळसांड करुन तिच्याही जीवाशी खेळ केल्याचा अमानवी व वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा गंभीर लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून कर्तव्यात कसूर, बाळाच्या मृत्यूस कारणीभूत व मातेच्या जीवाशी खेळण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

उपचाराच्या नावाखाली अर्थिक शोषण

या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या व धक्कादायक प्रकारानंतर वैजनाथ संभाजी मुंडे यांनी पोलिसांत धाव घेऊन गित्ते हॉस्पीटलच्या डॉ. कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, 'त्यांच्या पत्नीवर गेल्या काही महिन्यांपासून संबंधित डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. २३ ऑगस्ट रोजी अचानक पोटात दुखायला लागल्याने त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तातडीने दवाखान्यात येण्यास सांगितले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतरही योग्य वेळी तपासणी व उपचार करण्यात आले नाहीत. तसेच, सोनोग्राफीसाठी बाहेरील केंद्रावर पाठवण्यात आले. तेथे झालेल्या तपासणीनंतर गर्भातील बाळाची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. तरीही रुग्णालयात वेळेत आवश्यक वैद्यकीय निर्णय न घेता विलंब करण्यात आला. दरम्यान, उपचाराच्या नावाखाली वारंवार पैसे मागण्यात आले. प्रचंड अर्थिक शोषण करण्यात आले.'

मृत बाळ पोटात २२ तास ठेवले!

डॉक्टरांच्या अक्षम्य दुर्लक्ष व हलगर्जीमुळे गर्भातील बाळाचा मृत्यू तर झालाच परंतु गरोदर मातेच्या जीवाशीही खेळण्याचा प्रकार या डॉक्टरांनी केला. मृत बाळ पोटात असताना ते काढण्यासाठीच्या प्रसुती प्रक्रियेसाठी तब्बल २२ तास लावले. ही अतिशय गंभीर बाब असुन या मातेच्या जीवाशीच खेळण्याचा प्रकार केवळ अर्थिक फायदा उचलण्यासाठी करण्यात आला. या घटनेमुळे तक्रारदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या संपूर्ण प्रकरणात संबंधित डॉक्टरांनी निष्काळजीपणा करून रुग्णाच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप करत, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तसेच, या प्रकरणाची वैद्यकीय व कायदेशीर चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणीही करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांकडेही न्यायाची मागणी

दरम्यान, या धक्कादायक व अमानवी कृत्याची चौकशी करावी व वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली आर्थिक शोषण, मानसिक त्रास आणि नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अतिशय गंभीर असा हा प्रकार पवित्र समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा आहे. यापुर्वीही सोनपेठ तालुक्यातील एका महिलेच्या बाबतीतही याच डॉक्टरांनी असाच प्रकार केल्याचे समोर आले आहे. केवळ अर्थिक लाभ उठविण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार वारंवार घडत असून याबाबत वैजनाथ संभाजी मुंडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी आता सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT