आ. धनंजय मुंडे हे आ. सुरेश धस यांचयाशी चर्चा करताना. बाजूला चर्चा ऐकताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर. तर सप्ताह सांगता कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री पंकजा मुंडे. pudhri photo
बीड

Dhananjay Munde Suresh Dhas discussion : मुंडे-धसांच्या कानगोष्टी अन् पंकजा मुंडेंचे टायमिंग

म्हसोबावाडीतील सप्ताह सांगता सोहळ्यात लक्षवेधी भाषण

पुढारी वृत्तसेवा

उदय नागरगोजे

बीड : मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हसोबावाडी येथील सप्ताह सांगतेत केलेले भाषण सर्वांचेच लक्ष वेधणारे ठरले, मुख्यमंत्र्यांनीच गडाचा आणि गडाच्या भक्तांचा विकास करावा अशी मागणी तर केलीच याबरोबरच भाषण सुरू असताना पाठीमागे आ.धनंजय मुंडे हे आ.धस यांच्याशी चर्चा करत होते, तर त्यांची चर्चा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे ऐकत होते, यावर माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, त्यांच्याशी कानगोष्टी करणारे आ. सुरेश अण्णा धस आणि त्यांच्या कानगोष्टी ऐकणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर असा उल्लेख केला. त्यांच्या या वाक्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.

पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगडचा ९४ वा नारळी सप्ताह म्हसोबावाडी येथे आयोजित करण्यात आलेला होता. याचा सांगता सोहळा गुरुवारी महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे, आ.धनंजय मुंडे हे एकाच हेलीकॉप्टरमध्ये आले होते. प्रारंभी गडाच्या वतीने उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यांचा व त्यानंतर आ. सुरेश धस यांचे नाव सूत्रसंचालकाने सत्कारासाठी जाहीर केले होते.

यावेळी आ.धस यांनी धनंजय मुंडे यांचा सत्कार करावा, असे महाराजांना सूचवले. यानंतर आ. धस यांनी भाषणातून गडाच्या आष्टीतील महत्त्वाच्या रस्त्याबरोबरच गडाच्या पालखीमार्गाचे काम करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली. यानंतर आ.धनंजय मुंडे यांनी मनोगतातून हे गाव महंत विठ्ठल महाराज यांचे जन्मगाव असल्याचा आवर्जून उल्लेख केला. तसेच या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विर ोधातील उमेदवारांना शून्य मतदान मिळाले होते, अशी आठवण सांगितली.

स्व. गोपीनाथ मुंडे हे निवडणुकीला उभे असताना गावातील सर्व मतदान त्यांना मिळाले होते, यावर आक्षेप नोंदवण्यात आल्याने फेर मतदान घेण्यात आले होते, परंतु त्यातही पूर्वीचाच आकडा कायम राहिल्याची आठवण सांगितली. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने स्थापन केलेल्या ऊसतोड महामंडळ आपल्याकडे घेऊन मुख्यमंत्र्यांनी ऊसतोड मजुरांचे प्रश्न सोडवावेत अशी विनंती देखील केली. यानंतर झालेल्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या भाषणाने सर्वांचेच लक्ष वेधले.

पंकजा मुंडे या व्यासपीठावरील मान्यवरांची नावे घेत असताना पाठीमागे आ. धनंजय मुंडे व आ. सुरेश धस हे चर्चा करत होते, ही बाब पंकजा मुंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्यमंत्र्यानंतर माझे बंधू आ. धनंजय मुंडे, त्यांच्याशी कानगोष्टी करणारे आ. सुरेश धस आणि या कानगोष्टी ऐकणारे माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर असा उल्लेख केला... तसेच माझे कान सगळीकडे असतात, मी महिला आहे असे म्हटले. त्यांच्या या वाक्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.

यावेळी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांनी गडाचा आणि गडाच्या भक्तांचा विकास करावा अशी विनंती केली. याबरोबरच मुख्यमंत्रीच या कार्यक्रमाचे यजमान असल्याचे सांगितले. उपस्थितांना गोपीनाथ मुंडे आज कार्यक्रमाला उपस्थित असते तर तुम्ही कसे स्वागत केले असते, असे आवाहन करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.

२०३९ पर्यंतचे सप्ताह निश्चित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या भाषणातून संत परंपरा, संत वामनभाऊ यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच या ठिकाणची शिस्त आणि भक्तीभाव मला भावतो असे सांगितले. या ठिकाणचा नारळी सप्ताह घेण्यासाठी अनेक गावे उत्सुक असतात अगदी २०३९ पर्यंतचे सप्ताह निश्चित झाले असून त्याचे नारळ दिले गेले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT