Leopard Rumors : धारुरमध्ये बिबट्याच्या अफवेची दहशत file photo
बीड

Leopard Rumors : धारुरमध्ये बिबट्याच्या अफवेची दहशत

एआयचे बनावट छायाचित्र केले जात आहे व्हायरल; घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Panic in Dharur over rumors of a leopard

धारुर, पुढारी वृत्तसेवा : धारूर-जहागीरमोहा घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. डोंगराळ आणि जंगलसदृश परिसरामुळे वन्यप्राण्यांच्या वावराबाबत नागरिकांमध्ये उत्सुकतेसोबतच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच समाजमाध्यमांवर बिबट्याचे असल्याचे सांगून प्रसारित होणारी काही छायाचित्रे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आल्याचे समोर आल्याने अफवांच्या प्रसाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शनिवारी सकाळी बिबट्या दिसल्याचा दावा करत काही छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली. मात्र, ही छायाचित्रे एआय पच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याची माहिती पुढे आली. अशा बनावट छायाचित्रांमुळे नागरिकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण होण्याची शक्यता आहे. वारंवार चुकीची माहिती प्रसारित झाल्यास भविष्यात प्रत्यक्ष वन्यप्राण्याचा वावर आढळून आला तरी नागरिकांकडून त्याकडे गांभीर्याने पाहिले जाण्याची शक्यता कमी होऊ शकते.

बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित परिसरात जाऊन पाहणी केली. यावेळी पाऊलखुणांसह अन्य बार्बीची तपासणी करण्यात आली. मात्र, त्या दिवशी संबंधित परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध करणारे ठोस पुरावे आढळून आले नाहीत. प्रत्यक्ष बिबट्या पाहिल्याचा दावा करणाऱ्यांकडूनही ठोस माहिती उपलब्ध न झाल्याने वन विभागाकडून या माहितीची पडताळणी केली जात आहे.

अफवांपेक्षा सतर्कतेला महत्त्व

बिबट्याच्या संभाव्य वावराबाबत दक्षता घेणे आवश्यक असले तरी एआयच्या माध्यमातून तयार केलेली बनावट छायाचित्रे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित संदेश प्रसारित करणे टाळले पाहिजे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाच्या अधिकृत माहितीवर भर द्यावा. भीती पसरविण्यापेक्षा जबाबदारीने माहिती देणे हीच प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.

दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे; मात्र खात्रीशीर माहितीशिवाय छायाचित्रे, व्हिडिओ किंवा ऐकीव संदेश प्रसारित करून अफवा पसरवू नयेत, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी ईश्वर घुणावत यांनी केले आहे. संशयास्पद हालचाली अथवा वन्यप्राणी आढळल्यास तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT