जिल्ह्यात शेत/पाणंद रस्ते मोकळे करण्याचे आदेश file photo
बीड

जिल्ह्यात शेत/पाणंद रस्ते मोकळे करण्याचे आदेश

अतिक्रमण हटविण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Orders Issued to Clear Farm and Field Access Roads in the District

अतुल शिनगारे

धारूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाभरात शेत व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून ग्रामीण भागातील वाहतूक सुलभकरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापक पातळीवर आदेश लागू केले असून, सर्व तहसील प्रशासनांना याबाबत कड़क सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अतिक्रमणमुक्त रस्ते आवश्यक असल्याने नागरिकांनी स्वखुशीने अतिक्रमणे हटवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर धारूर तहसील कार्यालयानेही आपल्या हद्दीत शेत व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याबाबत मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार श्रीकांत निळे, सह नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, वरिष्ठ अधिकारी नजीर कुरेशी तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी संयुक्तपणे नागरिकांना सूचना दिल्या आहेत.

गाव नकाशानुसार अस्तित्वात असलेल्या शेत रस्त्यांवर काही ठिकाणी अनधिकृत अतिक्रमणे झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही अतिक्रमणे संबंधितांनी सात दिवसांच्या आत स्वखुशीने हटवावीत, अन्यथा प्रशासनाकडून थेट कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अतिक्रमण न हटवल्यास संबंधितांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १४३ तसेच मामलतदार अधिनियम १९०६ च्या कलम ५ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल.

याशिवाय अतिक्रमण हटविण्यासाठी येणारा खर्चही संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी शेतरस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे शेतीकामांसाठी आवश्यक असलेली वाहतूक अडथळ्यात येत आहे. ट्रॅक्टर, शेती अवजारे तसेच पीक वाहतुकीस अडचणी निर्माण होत असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने अतिक्रमणविरोधी कारवाई अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांनी शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेचा लाभघेण्यासाठी सहकार्य करावे, तसेच भविष्यात रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. अतिक्रमणमुक्त शेतरस्त्यांमुळे ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत होऊन शेतीकामांना गती मिळणार असून, शासनाच्या योजनेचा उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT