On Republic Day itself, an activist attempted to jump from the Parli Municipal Council building
परळी, पुढारी वृत्तसेवाः बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे गत सहा दिवसांपासून नगरपालिका कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या वैजनाथ सुरवसे या आंदोलकाने आज (दि. २६) रोजी प्रजासत्ताकदिनी नगरपालिका इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तब्बल दीड तास हा 'हायव्होल्टेज ड्रामा' सुरू होता. अखेर पोलिसांनी त्यास पकडून ताब्यात घेतले आहे.
परळी वैजनाथ नगरपरिषद कार्यालयात सोमवार दि. २६ जानेवारी रोजी नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते ध्वाजारोहण झाल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास आंदोलक वैजनाथ सुरवसे हे नगरपालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील छतावर गेले. त्या ठिकाणावरून फेसबुक लाईव्ह करत उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा दिला. हा प्रकार नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यास खाली येण्याच्या सूचना केल्या.
परंतु कर्मचारी व नागरिक त्यांच्याजवळ जाताच तो उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे आत्महत्येचा हा ड्रामा दुपारी दीड वाजेपर्यंत सरू होता. फेसबुक वर हा सर्व घटनाक्रम आंदोलकांनीच लाईव्ह केलेला असल्यामुळे नगरपालिका परिसरात बघ्याची मोठी गर्दी जमा झाली. तब्बल दीड तास चाललेला हा हायव्होल्टेज ड्रामा पोलिसांनी सुरवसे यांना ताब्यात घेतल्यानंतर थांबला. परळी नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी गत सहा दिवसांपासून नगरपालिका कार्यालयासमोर वैजनाथ सुरवसे यांनी उपोषण सुरू केलेले आहे. परळी नगरपरिषदेत २००१ ते २०२६ या कालावधीत २ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला.
हा भ्रष्टाचार करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करून कारवाई करावी ही प्रमुख मागणी घेऊन ते सातत्याने आंदोलन करत आहेत. नगरपरिषदेसमोर सुरू असलेल्या या आंदोलनाच्या ठिकाणी नगरपरिषद अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याची भूमिका वैजनाथ सुरवसे यांनी घेतली होती. त्यामुळे या आंदोलनावर तोडगा निघाला नव्हता.
फेसबुक लाईव्ह करत उडी मारण्याचा प्रयत्न
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वतः आंदोलक वैजनाथ सुरवसे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे तो व्हायरल केला आहे. त्यांच्या मते, परळी नगरपालिकेत गत २५ वर्षांत भक्ती एंटप्रायजेस या बोगस कंत्राटादाराने २ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला आहे. यामध्ये सहभागी असलेल्या मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, संतोष रोडे, आशिषकुमार अनिलकुमार दीक्षित, बापू नरवडे आणि संबंधित १५ प्रशासकीय अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी. त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केलेली आहे.
आंदोलकावर यापूर्वीच दाखल झाला होता गुन्हा
नगरपरिषदेसमोर आंदोलनाला बसलेले आंदोलक वैजनाथ सुरवसे यांनी उपोषण सुरू केल्यापासून तिसऱ्या दिवशी स्वतः नगर परिषद कार्यालयात जाऊन गोंधळ घातला होता. नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी यांच्या दालनात जाऊन शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशी तक्रार पोलिस ठाण्यात नगरपरिषद प्रशासनाने दिली होती. परळी नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी संतोष रोडे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीच गुन्हाही दाखल झालेला आहे.