

माजलगाव : माजलगाव नगर पालिकेच्या विविध समित्यांच्या तसेच सभापती पदाच्या निवड प्रक्रियेबाबत मंगळवारी (दि.२७) शहरात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत ही निवड प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, महाविकास आघाडीतील अंतर्गत गटबाजी, मतभेद आणि राजकीय कलहामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही.
निवड प्रक्रियेदरम्यान नगर पालिकेत मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नगरसेवकांमध्ये असंतोष दिसून येत होता. या पार्श्वभूमीवर माजलगावचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले असल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे मोहन जगताप गटाच्या पाच नगरसेवकांनी या निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. गटनेते उपस्थित नसल्यामुळे वेळेत न मिळाल्याने निवड प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच महाविकास आघाडीच्या गटाकडून वेळेत आवश्यक फॉर्म सादर न होऊ शकल्याची देखील चर्चा नगर पालिकेच्या वर्तुळात रंगली होती. या सर्व घडामोडी लक्षात घेता उपविभागीय अधिकारी गौरव इंगळे यांनी आज होणारी निवड प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता सभापती तसेच समित्यांच्या निवडीची प्रक्रिया दोन दिवसांनी पार पडणार आहे.
निवड प्रक्रिया पुढे ढकलल्याने शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले असून पुढील दोन दिवसांत कोणत्या हालचाली घडतात, कोणते नवे राजकीय समीकरण जुळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.