बीड: दुचाकी अपघातांमध्ये होणाऱ्या गंभीर जखमा व मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता, मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 नुसार दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक असल्याचे आदेश पुन्हा एकदा कडकपणे लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमधील अधिकारी-कर्मचारी यांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे.
हेल्मेट वापराबाबत यापूर्वीही वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशांचा संदर्भ देत, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी हे दुचाकी वाहनाने शासकीय कार्यालयात येताना तसेच सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालविताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक राहणार आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर संबंधित विभागप्रमुखांनी व्यवस्थापकीय नियंत्रण ठेवून आवश्यक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.तसेच, सर्व विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना या आदेशाची माहिती देऊन तसा अनुपालन अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे बीड जिल्हा अपघातमुक्त करण्याच्या दिशेने जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नियम सर्वांसाठी समान आहेत. स्वतःचा जीव सुरक्षित ठेवणे ही जबाबदारी प्रत्येकाचीच आहे, असे आवाहन करत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हेल्मेट सक्तीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून यासाठी व्यवस्थापकीय नियंत्रण देखील ठेवण्यात आले आहे. याशिवाय आपण स्वतः या सर्व बाबीचे निरीक्षण करणार असल्यचे त्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.