मुंबई :अंबाजोगाई - महाराष्ट्राला लवकरच आणखी एक नवीन महामार्ग मिळणार आहे. कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्गाला सरकारने हिरवा कंदील दिला आहे. हा महामार्ग तयार झाल्यानंतर कल्याण, ठाणे ते लातूर हा प्रवास फक्त ४ तासांचा होणार आहे. सध्या कल्याण ते लातूर प्रवासासाठी १० ते ११ तासांचा कालावधी लागतो.
हा महामार्ग तयार झाल्यानंतर अनेक शहरं जवळ येतील आणि त्याठिकाणी कमी तासांमध्ये पोहचणं नागरिकांना शक्य होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एमएसआरडीसीने हा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित केला आहे. ४४२ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग गेल्या अनेक दिवसांपासून कागदावरच आहे. पण आता या महामार्गाला महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी कल्याण -लातूर द्रुतगती महामार्गाला मंजुरी दिली. मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यामुळे आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यामुळे आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या प्रकल्पा संबंधीचा सविस्तर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पुढे पाठवला जाणार आहे. त्यानंतर या प्रकल्पाच्या आराखड्याच्या कामाला सुरूवात केली जाईल. हा महामार्ग तयार झाल्यानंतर मुंबईवरून लातूरला जाणाऱ्यांचा प्रवास सुसाट होईल आणि त्यांचा प्रवासाचा वेळ देखील वाचेल. या महामार्गामुळे मुंबई आणि लातूर हे दोन्ही जिल्हे जवळ येईल आणि वाहतुकीला मोठी चालना मिळेल. ज्यामुळे व्यापार, रोजगार आणि आर्थिक विकासाला देखील गती मिळेल.
४४२ किलो मीटर लांबीचा हा महामार्ग कल्याण येथून सुरू होईल. हा महामार्ग माळशेज घाटातून पुढे जाईल. त्यासाठी माळशेज घाटामध्ये ८ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाणार आहे. त्यानंतर हा महामार्ग अहिल्यानगर, बीड, मांजरसुंबा, अंबाजोगाईवरून थेट लातूरमध्ये जाईल. हा महामार्ग लातूरवरून पुढे महाराष्ट्र- कर्नाटक सीमेजवळ संपेल. म्हणजेच या मार्गावरून कर्नाटकात जाणं देखील अधिक सोपे होईल. महत्वाचे म्हणजे हा महामार्ग विरार- अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकशी देखील जोडला जाणार आहे.