अकरा आरोपींना वाढीव पोलिस कोठडी  pudhari photo
बीड

Neknoor stone pelting case : अकरा आरोपींना वाढीव पोलिस कोठडी

नेकनूर दगडफेक प्रकरण : तांत्रिक पुराव्यावर तपास वेगात, इतर यंत्रणांचीही चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

नेकनूर : किरकोळ धडकेच्या कारणावरून दोन गटांत उसळलेल्या वादातून झालेल्या दगडफेक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 11 आरोपींना न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून प्रकरणात इतर यंत्रणांचीही चौकशी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेकनूर येथे रिक्षाला धडक लागण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद झाला. त्याचे रूपांतर दगडफेक आणि मारहाणीमध्ये झाले. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रविवारी अटक करण्यात आलेल्या 11 आरोपींची एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने बुधवारपर्यंत वाढीव पोलीस कोठडी मंजूर केली.

घटनेनंतर गावात विविध चर्चांना उधाण आले असून काही निर्दोष व्यक्तींची नावे गुन्ह्यात समाविष्ट झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, “ज्यांचा थेट संबंध नाही, त्यांनाही अटक करण्यात आली,” असा आरोप काही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही राजकीय घटकांकडून होत असल्याचेही समोर येत आहे. मात्र पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत शांतता अबाधित राखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.तपासासाठी पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ तसेच इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.

सुमारे 40 ते 45 संशयितांची चौकशी सुरू असून ज्यांचा थेट सहभाग निष्पन्न होईल त्यांच्यावरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, काहींना जाणीवपूर्वक अटक केल्याच्या आरोपांमुळे संताप व्यक्त होत असून, या संदर्भात गावातील ज्येष्ठ नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही संबंधितांना योग्य चौकशी करून न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळत आहे.या प्रकरणामुळे गावातील वातावरण ढवळून निघाले असून, निष्पक्ष तपासातून सत्य समोर यावे आणि निर्दोषांना न्याय मिळावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT