मनोज गव्हाने
नेकनूर : गोरगरिबांच्या ताटातील घासावरही भ्रष्टाचाराची नजर पडावी, यापेक्षा दुर्दैवी काय? दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या बीड जिल्ह्यात एकीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी गरीब जनता संघर्ष करत असताना, दुसरीकडे सरकारी धान्य गोदामातील गलथान कारभारामुळे लाभार्थ्यांच्या हक्काची ज्वारी महिनाभर अडवून ठेवली जाते. नेकनूरच्या सरकारी धान्य गोदामातील अनागोंदी कारभाराचा हा प्रकार पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.
ऑक्टोबर महिन्यातील ज्वारी रेशन दुकानांपर्यंत पोहोचलीच नाही. लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याने संताप व्यक्त होत असतानाच, ‘पुढारी’ने १९ नोव्हेंबरच्या अंकात गोदामातील अनागोंदी आणि ज्वारी वितरणातील संशयास्पद प्रकार उघड केला. वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली.
विशेष म्हणजे, शासकीय सुट्टी असलेल्या शनिवार-रविवारच्या दिवशी घाईघाईने गोदामातून ज्वारीच्या गोण्या रेशन दुकानांच्या दारात आणून टाकण्यात आल्या. मात्र, दुकानात पोहोचलेल्या ज्वारीचा दर्जा पाहता अनेक गोण्यांना अक्षरशः पाय फुटल्याचे चित्र समोर आले. काही दुकानांमध्ये अद्याप ज्वारी पोहोचलेली नसल्याने हा प्रकार पूर्णपणे संपलेला नाही.शासकीय धान्य वितरणाचे नियोजन, साठ्याची नोंद, वाहतूक आणि वेळेत रेशन दुकानांपर्यंत धान्य पोहोचवण्याची जबाबदारी पुरवठा यंत्रणेवर असते.
मग ऑक्टोबर महिन्याची ज्वारी महिनाभर गोदामात का पडून राहिली? लाभार्थ्यांना वेळेत धान्य का मिळाले नाही? ‘पुढारी’ने बातमी प्रकाशित करताच सुट्टीच्या दिवशी वितरणासाठी एवढी घाई का झाली? निकृष्ट दर्जाच्या ज्वारीच्या गोण्या दुकानांपर्यंत पोहोचवण्यामागे नेमके कोणाचे आदेश होते? असे अनेक प्रश्न या प्रकाराने उपस्थित केले आहेत.
धान्याच्या गोण्यांची स्थिती, वजनातील तफावत, साठ्याच्या नोंदी आणि प्रत्यक्ष वितरण यांची तपासणी केली जाते की नाही, याबाबतही संशय निर्माण झाला आहे. कागदोपत्री साठा आणि प्रत्यक्ष गोदामातील धान्य यांचा ताळमेळ तपासला, तरच या अनागोंदीमागील वास्तव समोर येऊ शकते.
भक्षकच रक्षक बनला का?
गोदामातील धान्याची योग्य नोंद न ठेवणे, लाभार्थ्यांच्या हक्काचे धान्य वेळेवर वितरित न करणे, तक्रारींकडे दुर्लक्ष करणे आणि बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अचानक हालचाली सुरू होणे, या सगळ्या घटनांमुळे गोदामाच्या कारभारावर संशयाची सावली गडद झाली आहे. धान्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेली यंत्रणाच जनतेच्या हक्कावर गदा आणत असेल, तर ‘रक्षकच भक्षक बनला का?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गोदामातील साठ्याची प्रत्यक्ष तपासणी, ऑक्टोबर महिन्याच्या ज्वारीचा आवक-जावक तपशील, गोण्यांचे वजन, धान्याचा दर्जा, वितरणाच्या नोंदी आणि विलंबासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. केवळ दुकानात गोण्या पोहोचवून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला, तर जनतेच्या प्रश्नांना उत्तर मिळणार नाही.
वरिष्ठ अधिकारीही हतबल?
नेकनूर गोदामातील प्रकार समोर आल्यानंतर पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारीही या अनागोंदी कारभारासमोर हतबल असल्याचे चित्र दिसत आहे. वितरणातील विलंब, गोदामातील नोंदी, धान्याचा दर्जा आणि जबाबदारी निश्चित करण्याबाबत यंत्रणेकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने कनिष्ठ स्तरावरील कारभारावर नियंत्रण नेमके कुणाचे, असा प्रश्न निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकारी केवळ अहवाल मागवून आणि खुलासे घेऊन थांबणार की प्रत्यक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गरिबांच्या ताटात निकृष्ट ज्वारी; जबाबदार कोण?
"आम्ही रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. शासनाकडून मिळणाऱ्या रेशनवर आमच्या घरातील अनेकांचा संसार चालतो. महिन्याचे धान्य वेळेवर मिळाले नाही, तर बाजारातून धान्य विकत घेण्याची ऐपत आमच्याकडे नाही. आता महिनाभर उशिराने ज्वारी आली, तीही फुटलेल्या आणि निकृष्ट गोण्यांमधून. आम्हाला धान्य हवे, पण ते चांगल्या दर्जाचे आणि पूर्ण वजनाचे हवे. आमच्या हक्काच्या धान्याचा असा खेळ करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. बातमी आल्यानंतरच अधिकारी जागे होत असतील, तर सामान्य माणसाने न्याय मागायचा तरी कोणाकडे?"