केज :- सशुल्क पोलिस संरक्षण घेऊन शेतातील अतिक्रमण हटवून ताबा देण्याची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकातील महिला पोलिसांवर चार महिलांनी हल्ला केला आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील टाकळी रोड लगत असलेल्या सर्व्हे नंबर ३७१ मधील वसीम साबेर कुरेशी यांच्या मालकी हक्कातील जमीनीवरील अतिक्रमण हटवून त्याचा ताबा देण्या संदर्भात वसीम कुरेशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सशुल्क पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती.
त्या नुसार दि. २१ नोव्हेंबर रोजी सिंधूबाई कदम यांना त्यांनी केलेले अतिक्रमण काढून घेण्या संदर्भात नोटीस बजावली होती. दि. २४ नोव्हेंबर रोजी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, पोलिस हवालदार फुलचंद सानप, महिला पोलिस पूजा माके, महिला पोलीस भाग्यश्री भालेराव यांचेसह मंडळ अधिकारी दयानंद मस्के, मंडळ अधिकारी नितीन भालेराव यांच्यासह गेले होते.
यावेळी वसीम कुरेशी यांच्या मालकी हक्कातील सर्व्हे नंबर ३७१ मधील ७ गुंठे मध्ये सिंधू कदम यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यासंदर्भात पथक कारवाई करीत असताना त्यांना सदरचे अतिक्रमण तुम्ही आतापर्यत का हाटविले नाही? असे विचारले असता सिंधू कदम यांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. त्यांना समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिची मुलगी मिराबाई लक्ष्मण देटे व नातेवाईक भाग्यश्री रामेश्वर गायकवाड, रुक्मीनी गोपाळ फावडे हे आले. त्यांनी आल्या नंतर त्या सर्वानी कर्तव्यावरील महिला पोलीस अंमलदार यांच्या अंगाशी झोंबाझोंबी करू लागले. तसेच आरडा ओरड करून गोंधळ सुरू केला. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत असतांना सिंधुबाई कदम ही महिला पोलीस अंमलदार यांचे अंगावर दगड घेऊन धाऊन गेली.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे यांनी दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री १०:०० सुमारे दिलेल्या तक्रारी वरून सिंधुबाई रतन कदम, मिराबाई लक्ष्मण देटे, भाग्यश्री रामेश्वर गायकवाड (रा. कदमवाडी ता. केज) रुक्मीनी गोपाळ फावडे (रा. वैष्णवी देवी मंदीर समोर बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता हणवते या तपास करीत आहेत.