गौतम बचुटे
Daughter Kidnapping
केज : १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला सोबत ४१ दिवस ताब्यात ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनेला ७७ दिवस उलटून सुद्धा आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात आलेली नाही. म्हणून केज तालुक्यातील एक महिला ही जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एक विवाहित महिला ही तिच्या नवऱ्याशी मतभेद असल्याने दोन मुली आणि एका मुलासह माहेरी राहत आहे. दि. २८ एप्रिल रोजी ती महिला व तिची ११ वीच्या वर्गात शिकत असलेली १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी ही गावात सुरू असलेल्या कीर्तनाला गेली होती. कीर्तनाच्या कार्यक्रमातून रात्री ११:०० तिला शाम तपसे या तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. तिचा नातेवाईकांनी शोध घेतला असता ती आढळून आली नाही.
या प्रकरणी दि. २९ एप्रिल रोजी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गु र. नं. १२३/२०२५ भा. न्या. सं. १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तिला पळवून नेणाऱ्या संशयित आरोपीचे देखील नाव पोलिसांना कळविण्यात आले होते.
त्यानंतर ४१ दिवस उलटला नंतर आरोपीचे चुलते सखाराम तपसे याने त्या अल्पवयीन मुलीला युसुफवडगाव पोलिस ठाण्यात आणून सोडले. त्या ४१ दिवसा मध्ये तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचा जवाब पीडितेने पोलिसांना दिल्या नंतर सुद्धा पोलिसांनी आरोपी आणि त्याला मदत करणारे त्याचे नातेवाईक यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्याचा तपास पिंक पथका मार्फत करण्यात येत आहे. तसेच पीडित मुलगी ही बाल न्याय मंडळाच्या आदेशा नुसार बीड येथील महिला सुधार गृहात ठेवण्यात आलेले आहे.
घटनेला ७७ दिवस उलटून देखील न्याय मिळत नसून पोलिस आरोपीला मदत करीत असल्याचा संशय व्यक्त करून पीडितेची आई ही दि. ३० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आमरण उपोषणाला बसली आहे.