MLA Babanrao Lonikar: Citizens' problems should be resolved
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा या शिविरांचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांच्या प्रलंबित महसुली प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करून शक्य तितक्या समस्या शिबिरस्थळीच निकाली काढाव्यात, असे निर्देश आ. बबनराव लोणीकर यांनी दिले.
'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' या अभियानाची सुरुवात शनिवार (दि. ७) रोजी आष्टी (ता. परतूर) येथे करण्यात आली. यावेळी आ. बबनराव लोणीकर बोलत होते. शिबिरांचे उद्घाटन माजी मंत्री तथा आ. बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपविभागीय अधिकारी गायकवाड, तहसीलदार पद्माकर दामोधर जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे, गटविकास अधिकारी राजेश तांगडे, तालुका कृषी अधिकारी देवानंद सांगवे, ग्राम विकास अधिकारी डी.बी.काळे यांची उपस्थिती होती. या वेळी विविध खात्या अंतर्गत राबविण्यात आलेल्या सेवांचा ५१३ लाभार्थीनी लाभ घेतला.
शिबिरा दरम्यान सातबारा अभिलेखा वरील दुरुस्ती, प्रलंबित फेरफार, नोंद दुरुस्ती, लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्रमाणपत्रे, डिजिटल सातबारा ई-मोजणी, ई-फेरफार, पीएम किसान, अॅग्री स्टॅक, तक्रार निवारण, भूसंपादन, अकृषिक जमिनीचे प्रकरणे, तुकडेबंदी, तसेच अकृषिक परवानगीसंदर्भातील नोंदी अद्ययावत करणे यासह विविध कामे करण्यात येणार असल्याचे शिबीर प्रसंगी नियोजन झाले.
शिबीरास तुकाराम सोळंके, सरपंच मधूकर मोरे, उपसरपंच नसरूल्ला खॉन, काकड लोणी येथील सरपंच गजानन लोणीकर, अमोल जोशी, बाबाराव थोरात, आसीफ कच्छी, मुजीबभाई, बकंठ सोळंके, माणीकराव वाघमारे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
विविध योजनांची माहिती दिली
जमीन नोंदी, फेरफार, वारसा नोंद, उत्पन्न व जातीचे दाखले, तसेच विविध शासकीय योजनांबाबतची माहिती आणि लाभ यासंदर्भातील प्रश्नांचे निराकरण प्राधान्याने करण्यात यावे, असे उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे यांनी सांगितले.