Minister Pankaja Munde visits the fields for the second consecutive day
बीड, पुढारी वृत्तसेवा : शेतातील परिस्थिती पीके पूर्ण हातातून गेल्याने पर्सि खरचं खूप गंभीर बनली आहे. दुष्काळाने कुणालाही सोडले नाही. दुष्काळातील प्रत्येक गोष्टीची सरकार गंभीरपणे दखल घेत आहे, पशुधनाला चारा आणि पाणी देण्याला प्राधान्य देत आहोत त्यामुळे बळीराजाने खचून जाऊ नये, सरकार पूर्णपणे पाठिशी आहे, पिकाच्या नुकसानीची भरपाई दिली जाईल अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज शेतकऱ्यांना धीर देत त्यांचे अश्रू पुसले.
पंकजाताई मुंडे यांनी रविवारी सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, युवा नेते अक्षय मुंदडा यावेळी त्यांच्यासमवेत होत्या. केज मतदारसंघातील डिघोळ अंबा, सारूळ, झाला पाटी, जैताळवाडी (नेकनूर), येळंब घाट आदी भागातील शेतात जाऊन ना. पंकजाताई मुंडेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी यात झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी त्यांचे समुपदेशन करून मानसिकदृष्ट्या त्यांची तयारी व्हावी यासाठी मी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करत आहे, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे त्या म्हणाल्या.
शेतकऱ्यांवर आलेले संकट आम्ही गंभीरपणे घेतले आहे, दुष्काळातील प्रत्येक गोष्ट सरकार गंभीरपणे घेत आहे, त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून नये यावर आम्ही काम करत आहोत. सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, शेतकऱ्यांना निश्चित नुकसान भरपाई दिली जाईल, आजच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेतली, उद्या मुंबईत गेल्यावर कॅबिनेट बैठकीत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. बळीराजाने खचून जाऊ नये असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या.