केज : वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने राज्यभरात आणि परराज्यात फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला केज पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सौरभ सुहास कुलकर्णी (रा. नागपूर) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आतापर्यंत 15 ठिकाणी फसवणूक करत तब्बल 3 कोटी 86 लाख 61 हजार रुपयांचा गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथील डॉ. अविनाश रामचंद्र तोंडे (वय 27) यांची फेसबुकवरून एस.के. एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून सौरभ कुलकर्णी याच्याशी ओळख झाली होती. फिर्यादी तोंडे यांना एमडी मेडिसिनसाठी प्रवेश घ्यायचा असल्याने आरोपीने त्यांना जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, वर्धा येथे मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
यासाठी 99 लाखांची फी 65 लाख रुपयांवर तडजोड करून ठरवण्यात आली. प्रवेशासाठी ॲडव्हान्स म्हणून आरोपीने 20 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024 या काळात डॉ. तोंडे यांच्याकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात 8 लाख रुपये उकळले. मात्र, पैसे देऊनही प्रवेश न मिळाल्याने आणि पैसे परत करण्यास नकार दिल्याने डॉ. तोंडे यांनी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
15 गुन्हे आणि आंतरराज्यीय रॅकेट
सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी या गुन्ह्याचा तपास हाती घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी सौरभ कुलकर्णी याच्यावर नाशिक, सोलापूर (ग्रामीण व शहर), जालना, नागपूर, पुणे, मुंबई, सांगली या जिल्ह्यांसह पंजाब (अमृतसर) आणि गुजरात (देसा सिटी) राज्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने विविध ठिकाणी लोकांची एकूण 3 कोटी 86 लाख 61 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
साताऱ्यातून उचलले : आरोपीचा शोध घेण्यासाठी केज पोलिसांचे पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रवाना करण्यात आले होते. या पथकाने 13 जानेवारी 2026 रोजी कराड (जि. सातारा) येथून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम, पोलीस उपनिरीक्षक जावेद कराडकर आणि त्यांच्या पथकाने केली.
असा लावला सापळा
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी स्वतः या तपासाची सूत्रे हाती घेतली होती. आरोपी सातत्याने ठिकाणे बदलत होता. बीडच्या सायबर व टेक्निकल ॲनालिसिस सेलची मदत घेत आरोपीचे लोकेशन शोधून त्याला साताऱ्यात बेड्या ठोकण्यात आल्या.