MCOCA action against Gotya Geete again
बीड, पुढारी वृत्तसेवा: सातभाई मारहाण प्रकरणातील आरोपी गोट्या गीते याच्यावर पोलिसांकडून पुन्हा एकदा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. गोट्या गीते याच्यासह त्याच्या साथीदारांवर लावलेला मकोका अपर पोलिस महासंचालकांनी रद्द केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनित कावत यांनी दिली.
परळी येथील सहदेव सातभाई यांना गंभीर मारहाण व लुटमारीची घटना घडली होती. या टोळीचा प्रमुख रघु फड, गोट्या गिते याच्यासह सातजणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. ती कारवाई अपर पोलिस महासंचालकांनी रद्द केली होती.
गोट्या गीते याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, असे दहा ते पंधरा गंभीर गुन्हे असून, तो फरार आहे. टोळीतील गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गिते या पाच जणांचा मकोका रद्द करण्यात आला होता. यानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या सर्व घडामोडींना आठवडा होत नाही तोच पुन्हा एकदा गोट्या गीते याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गोट्या गीते हा अनेक महिन्यांपासून फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. दुसरीकडे त्याच्यावर पुन्हा एकदा मकोका लागला आहे.