Beed News : आरोपीच्या अटकेसाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम file photo
बीड

Beed News : आरोपीच्या अटकेसाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम

बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

Massive march on Collectorate in Beed; Adv. Participation of Gunaratna Sadavarte

बीड, पुढारी वृत्तसेवा : विलास घुले हत्या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने खा. बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांच्यावर आरोप होत आहेत. सीआयडीने या प्रकरणात सखोल तपास करून आठ दिवसांत कारवाई करावी असा अल्टीमेटम अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. विलास घुले हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी शुक्रवारी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी अॅड. सदावर्ते बोलत होते.

केज तालुक्यातील टाकळी येथील स्व. विलास घुले यांना न्याय मिळावा, खासदार पुत्राला अटक करावी, यासह विविध मागण्यांसाठी स्व. घुले यांच्या पत्नी सुषमा घुले, भाऊ रमेश घुले आणि 60 वर्षीय आशाबाई घुले यांचे मागील 18 दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या मागण्यांना पाठिबा देण्यासाठी शुक्रवारी (दि.21) बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील विविध भागांतून समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

व्यासपीठावर ओबीसी नेते तथा माजी आमदार नारायणराव मुंडे, आरक्षण अभ्यासक अॅड. गुणरत्न सदावर्ते, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, भगवान सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत सानप, ओबीसी आंदोलक बटूळे बाबा, अॅड. जयश्री पाटील, अॅड. मंगेश ससाणे, धनराज गुट्टे, बळीराम खटके, मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, नितीन सोनवणे, नगरसेवक सतीश बडे, अॅड. भाऊसाहेब लटपटे, माऊली सिरसट, मोहन आघाव, अॅड. राहुल आघाव, केशव तांदळे, संजय केदार, मनीषा सानप, मयुरी बांगर यांच्यासह ओबीसी समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

विविध न्याय मागण्यांचे निवेदन बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अॅड. गुणरत्न सदावर्ते व घुले कुटुंबीयांच्या उपस्थितीत देण्यात आले. त्यानंतरॲड. जयश्री पाटील व सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते रमेश घुले व त्यांच्या कुटुंबीयांचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. या मोर्चात समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, स्व. विलास घुले यांना न्याय द्या, खासदार पुत्राला अटक करा, अशा विविध घोषणाफलकांनी लक्ष वेधून घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT