Massive fire at a warehouse storing cotton seeds
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड शहरातील एमआयडीसी भागात सरकी ठेवलेल्या एका गोदामाला सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या गोदामामध्ये अकराशे टन सरकी व नऊशे टन सरकी पेंड ठेवण्यात आलेली होती. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या परंतु बारा तासांनंतरही ही आग धुमसतच होती. पूर्ण आग विझण्यासाठी किमान दोन दिवस लागतील असा अंदाज वर्तवण्यात येत असून सरकीमध्ये तेलाचा अंश असतो, त्यामुळे आग आटोक्यात येत नसल्याचे जाणकारांनी सांगितले.
बीड शहरातील एमआयडीसी भागात खटोड यांचे गोदाम आहे. या गोदामात सुभाषचंद्र सारडा यांनी सरकी पेंड तयार करण्यासाठी खरेदी केलेली सरकी व तयार झालेली पेंड स्टॉक करून ठेवली होती. सोमवारी पहाटेच्या वेळी या गोदामाला आग लागल्याचे समोर आले. यानंतर बीड अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली.
अग्निशामक दलाची गाडी त्या ठिकाणी पोहचल्यानंतर गोदामाचे शटर उघडण्यात आले. यामुळे हवेचा झोत गोदामात पोहचताच आग अधिकच भडकली, नेमकी त्याच वेळेला बीड अग्निशामक दलाच्या गाडीत बिघाड झाल्याने पाणीच बाहेर पडले नाही. यानंतर गेवराई, वडवणी येथील नगरपालिका व बाजार समितीच्या अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या. या गाड्यांबरोबरच तब्बल चाळीस टँकर या ठिकाणी पाणी टाकत असतानाही बारा तासांनंतरही आग आटोक्यात आलेली नाही. सरकी ही ज्वलनशील असल्याने आणखी दोन दिवस आग धुमसत शहरातील एमआयडीसी भागात सरकी ठेवलेल्या गोदामाला लागलेली आग राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कारण या आगीवर पाणी मारताच ती काही काळ विझते, परंतु पुन्हा काही वेळाने धुमसत असल्याने अग्निशामक दलाचे जवानदेखील हतबल झाले आहेत. दरम्यान, आगीने निर्माण झालेल्या उष्ण-तेने या गोदामाच्या भिंतींना तडे जाऊन त्या कोसळल्या आहेत. बीड अग्निशामक दलाचे किशोर जाधव, विष्णू कानतोडे, गोरख ढोकणे, सुशील काळे, अनिकेत कपाळे, बाळू जंगले, प्रकाश तिडके, नितीन अडागळे, अनिकेत ओव्हाळ ओकार राठोड या कर्मचाऱ्यांसह इतर नगरपालिका, बाजार समितीच्या अग्निशामक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
बीड बाजार समितीकडे अग्निशमन यंत्रणाच नाही
शहरातील मोंढा तसेच एमआयडीसी भागात मोठमोठे उद्योग, व्यवसाय आहेत. या ठिकाणी एखादी आगीची घटना घडली तर तत्काळ अग्निशामक दल यंत्रणा उपलब्ध व्हावी यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यायला हवा. परंतु अशी कोणतीही यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध नाही. यापूर्वी अस-लेले अग्निशामक दलाचे वाहन दोन वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनात पेटवून देण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत नवीन वाहन खरेदीसाठी संचालक मंडळाने कोणतीही हालचाल केलेली नाही. किमान आता तरी यासाठी पावले उचलावीत आणि उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यापारी, उद्योजकांमधून होत आहे.