केज : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीला आता निर्णायक वळण मिळाले असून अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्याने या लढतीला विशेष भावनिक आणि राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती. त्या घटनेनंतर जवळपास वर्षभर सरपंचपद रिक्त राहिले. आता या पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्याने गावातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे.देशमुख कुटुंबाने ग्रामस्थांशी चर्चा करून सहानुभूतीच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.
माजी सरपंच म्हणून त्यांचा अनुभव आणि कुटुंबाला असलेला पाठिंबा यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे प्रयत्नही सुरू होते. मात्र, मागील निवडणुकीत संतोष देशमुख यांच्याकडून पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी पुन्हा मैदानात उतरत अर्ज दाखल केल्याने लढत रंगतदार झाली आहे.
दरम्यान, केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या नुकत्याच झालेल्या अपघाती निधनामुळे गावात शोककळा असतानाच अश्विनी देशमुख यांनी अत्यंत साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.या ग्रामपंचायतीत सुमारे 2,284 मतदार असून सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल असल्याने अंतिम उमेदवारांचे चित्र त्यानंतर स्पष्ट होईल. मात्र सध्याच्या घडीला ही निवडणूक ‘सहानुभूती विरुद्ध राजकीय आव्हान’ अशी रंगणार असल्याची चर्चा गावात रंगली आहे.
स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली भावनिक लाट, देशमुख कुटुंबाची पकड आणि दुसरीकडे विरोधकांचे आव्हान यामुळे मस्साजोगची ही पोटनिवडणूक केवळ स्थानिक न राहता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. आगामी काळात या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.