Market in It shut down in protest against the windmill project
ईट, पुढारी वृत्तसेवा : ईट परिसरात सुरू असलेल्या पवनचक्की उभारणीच्या कामाला शेतकरी व ग्रामस्थांनी विरोध केला आहे. लगतच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तसेच जमिनीचा योग्य मोबदला न देता कामे केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या दडपशाहीच्या विरोधात आणि प्रशासकीय अनास्थेच्या निषेधार्थ रविवारी (दि. ५) ईट येथील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून नागेवाडी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पवनचक्की उभारणीसाठी शेतातून रस्ते तयार करण्यात आले असून, संबंधित रस्त्यांचा वापर करताना शेतकऱ्यांना कोणताही मोबदला दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांनी या वाहतुकीस विरोध केल्यास पोलिस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दबाव आणला जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काही शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.
पवनचक्की प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी व हक्कांवर अन्याय होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनात माजी सभापती प्रताप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुनील देशमुख, कृषी बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, ग्रामपंचायत सदस्य सयाजी हुंबे, बापूसाहेब खांडेकर, काँग्रेसचे समीर काझी, शेतकरी संघटनेचे अनंत डोके, शिवसेना ठाकरे गटाचे श्रीमंत डोके, राजाभाऊ हुंबे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.