सुभाष मुळे
गेवराई: मराठवाड्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या घरातील हसू हरवून गेलं आहे. त्याच्या घरात केवळ दुःख आणि आक्रोशाचा जणू पूरच उसळला आहे. कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची झाली माती” अशा स्वरूपातील दृष्य शेतकरी आणि युवक आपल्या भावनांना मोकळी वाट देत आहेत.
या ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं वाहून गेली, जनावरे उपाशी राहिली, संसार उद्ध्वस्त झाला. तरीही मदतीसाठी सरकारकडून म्हणावी तशी ठोस पावले उचलली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “मायबाप सरकार जागे व्हा, शेतकऱ्यांचं मरण आलंय उघड्या डोळ्यांनी पाहा” असा हतबल आक्रोश लोकांमध्ये उमटताना दिसतो.
ओल्या दुष्काळाने शेतकरी संकटात सापडला असतानाही सत्ताधाऱ्यांनी केवळ खुर्च्यांच्या खेळात रमल्याची टीका केली जात आहे. “शेतकऱ्यांची शेतं वाहून गेली, सरकार मात्र खुर्च्यांच्या खेळात रमली” आणि “सत्ता आली तर नेते आमचे, पण संकटात बळीराजा एकटा” अशा भावनांद्वारे ग्रामीण भागातून असंतोष व्यक्त केला जात आहे. “अजित दादा अतिवृष्टीवर बोला, सरकारी तिजोरीचं कुलूप खोला”, “ओला दुष्काळ जाहीर न करणं, हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा अपमान” अशी मागणी ठामपणे पुढे सरसावत आहे.
तरुणाईचा सूरही यामध्ये ठळकपणे उमटतो. “खूप उचलले पक्षांचे जोडे, पोरांनो आपल्या बापासाठी लढूया थोडे”, “पुरे झालं जातीसाठी, आत्ता लढूया मातीसाठी” अशा घोषणांमधून शेतकरी तरुणांच्या भावनांना दिशा मिळत आहे. लग्न, संसार आणि दैनंदिन जीवनावर आलेल्या संकटांचीही हृदय पिळवटून टाकणारी उदाहरणे पुढे आली आहेत. दिवाळीनंतर ठरलंय ताईचं लग्न, नशीबी आलंय अतिवृष्टीचं विघ्न” आणि “लग्नाला आली तरणी पोरं, पावसानं पिक गेलं, बापाच्या जीवाला लागलाय घोर” या शेतकऱ्यांच्या वेदनांना असाह्य शब्द दिला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पीकविमा आणि अनुदान तातडीने वितरीत करणे, “शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, तरच बळीराजा सुरक्षित राहील”, “तुझ्या बापाचा विमा कोणी खाल्ला ? तुझ्या भाऊ-ताईला प्रश्न विचारायला शिक” अशा स्वरातील असंतोष जाहीरपणे मांडला जात आहे. जनावरांचे हाल, पिकांचे नुकसान आणि संसाराचा उद्ध्वस्त होणारा चेहरा अनेकांना असह्य वेदना देत आहे. “पोटच्या पोरासारखी सांभाळलेली जनावरे आणि पिकं डोळ्यादेखत वाहून जाताना पाहून शेतकऱ्याच्या अंतःकरणात किती यातना होत असतील” या वाक्यांतून शेतकऱ्यांची खरी व्यथा व्यक्त झाली आहे.