Beed Parli Highway Rasta Roko
पिंपळनेर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच नाळवंडी परिसरातील सकल मराठा समाजाच्या बांधवांनी बीड-परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. जरूड फाट्याजवळ करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील विविध गावांमधील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या मांडल्याने बीड-परळी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना चारचाकी वाहने आणि दुचाकींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आंदोलनस्थळी मोठी गर्दी झाल्याने पिंपळनेर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी काही आंदोलकांनी मनोगत व्यक्त करत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, बीड-परळी महामार्गावर रास्तारोको सुरू असल्याची माहिती मिळताच बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून मराठा आरक्षणासंदर्भातील त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यात आले.
तहसीलदारांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला. त्यानंतर महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत सुरू झाल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांनी दिली.