केज (बीड) : मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही; परंतू ईडब्ल्यूएस आणि दहा टक्के आरक्षण असतानाही मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे. खरे तर मराठा आरक्षण लढा हा राजकीय वर्चस्वासाठी घातलेला घाट आहे, असा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला.
नांदूरघाट (ता. केज) येथील संत भगवान बाबा चौकात ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण होके व नवनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षण बचाव संवाद यात्रेनिमित्त बुधवारी (दि.२४) ओबीसींचा मेळावा घेण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते.
प्रा.हाके म्हणाले की, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची मुख्य मागणी आहे. ओबीसीतील बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींचे आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी आमचा लढा सुरु आहे. कुठल्यातरी एका व्यक्तीने झुंडशाहीच्या जोरावर सर्व लोकांना एकत्र करून मला आरक्षण मिळालं पाहिजे. मी आरक्षण घेणारच, असं म्हणणं म्हणजे हे घटना विरोधी वक्तव्य आहे. लोकशाहीच्या मूलभूत तत्वाचा हा अवमान आहे. ही हुकूमशाही वृत्ती आहे. एका आंदोलकाने निवडणुकीमध्ये पाडण्याची भाषा करणे योग्य नाही, असेही प्रा.लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले. मेळावा सुरु असताना पाऊस येत होता. मात्र भरपावसातही ओबीसींनी एकजुट दाखवून कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. या वेळी जिल्हा भरातून ओबीसी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.