केज :- मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी अंतरावली सराटी ते मुंबई निघालेल्या मोर्चात सहभागी झालेले बीड जिल्ह्यातील वरपगाव ता. केज येथील मराठा सेवक स्व. सतिश ज्ञानोबा देशमुख यांचा हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने पुणे जिल्ह्यात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांच्यावर कर्ज आहे आणि ते अल्पभूधारक शेतकरी असल्याने त्यांच्या मुलाचा समावेश सरकारी नोकरीत करण्यात यावा; तो पर्यंत स्व. सतिश देशमुख यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
बीड जिल्ह्यातील वरपगाव ता. केज येथील सतीश ज्ञानोबा देशमुख या ४५ वर्षीय तरुणाचा मनोज दादा जरांगे यांच्या आंतरवली सराटी ते मुंबई या मराठा आरक्षण मागणीसाठी निघालेल्या मोर्चात सहभागी असताना त्यांना जुन्नर येथे हृदय विकाराचा झटका आला. त्या नंतर त्यांना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील रुग्णालयात मृत्य झाला. मृत्यू झाल्याचे समजताच मनोज दादा जरांगे यांनी नारायणगाव येथील रूग्णालयात जाऊन त्यांच्या भावाचे सांत्वन केले.
दरम्यान सतीश देशमुख यांचे पार्थिव वरपगाव येथे आणण्यात येत असून दि. २९ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी ९:०० वाजता अंत्यविधी होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास वरपगाव येथील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, सतीश देशमुख यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे. ते अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज आहे. त्यामुळे सतीश देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा. त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी देण्यात यावी. जो पर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि त्यांच्या मुलाला सरकारी नोकरीत समावेश होत नाही. तो पर्यंत स्वर्गीय सतिश देशमुख यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार न करण्याचा निर्णय वरपगाव येथील ग्रामस्थानी घेतला आहे. या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले आहे.
" माझे चुलते सतीश देशमुख यांचा एक मुलगा पूर्वी विजेचा शॉक लागून मृत्यू पावला आहे. तर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आणि वाईट असल्याने त्यांच्या मुलाला न्याय देऊन त्याला सरकारी नोकरी द्या."-- जयदीप देशमुख (पुतणे)